राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यापेक्षा कृतीत आणण्याची गरज
By admin | Published: January 30, 2017 03:33 AM2017-01-30T03:33:48+5:302017-01-30T03:33:48+5:30
राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात जनार्दन बोथे यांचे प्रतिपादन.
अकोला, दि. २९- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजणे फार कठीण आहे. अनेक वर्ष मी त्यांच्या सहवासात घालविली; परंतु अद्यापही महाराज मला पूर्ण कळलेले नाही. आजही मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि सुविचारी समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक साहित्यरचना केल्या. भजने लिहिली आणि समाजजागृतीचे कार्य केले; परंतु अद्यापही समाज जागा झालेला नाही. त्यामुळे आम्हाला अधिक गतीने कार्य करण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासोबतच कृतीत आणण्याची गरज आहे. असे मत अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये आयोजित चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते. विचारपीठावर माजी मंत्री गुलाबराव गावंडे, स्वागताध्यक्ष डॉ. अभय पाटील, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. भास्करराव विघे गुरुजी, नीरज खोसला, प्राचार्य काळे, डॉ. रघुनाथ वाडेकर, अँड. रामसिंग राजपूत आदी होते.
जनार्दन बोथे म्हणाले, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य सर्वदूर पसरविण्याची गरज आहे आणि या कार्यातून समाजाचे प्रबोधन करून एक सशक्त समाज निर्माण व्हायला हवा. त्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. सद्य परिस्थिती समाजासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार, त्यांचे साहित्यच समाजाला तारू शकते. एक बलशाली भारत निर्माण करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये आहे, असेही जनार्दन बोथे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमामध्ये ग्रामगीताचार्य पदवी मिळविणारे कर्डीकर गुरुजी, वंदन कोहाडे, सौ. मानकर, रामकृष्ण गावंडे, सौ. खडतळकर, भरत राऊत आणि उत्कृष्ट कार्य करणार्या श्रृती देशमुख, सोनाली शर्मा, संदीप देशमुख, पत्रकार शिवाजी भोसले, विवेक मेतकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले, गोपाल गाडगे यांनी केले. आभार प्रा. डॉ. राजीव बोरकर यांनी मानले. सामुदायिक प्रार्थनेने विचार साहित्य संमेलनाची सांगता झाली.
संस्कार, संस्कृती जपण्याची गरज- गुलाबराव गावंडे
- समाजामध्ये बीभत्स वातावरण निर्माण झाले आहे. टीव्ही, मोबाइलमुळे महिला, तरुणींच्या वर्तनात, राहणीमानात बदल झाला आहे. एकप्रकारे अंगप्रदर्शन करून प्रतिष्ठा घालविण्याचे काम होत आहे. आपले संस्कार, संस्कृतीचा विचार समाजाला विसर पडत चाललाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, साहित्य समाजासाठी प्रेरक आहे. तरुण, तरुणींनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी विचार साहित्य संमेलनात बोलताना केले.