रेशन कार्डधारकांना मे महिन्यात मिळणार मोफत धान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:28+5:302021-04-28T04:20:28+5:30
अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची ...
अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी रेशन कार्डधारकांना मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारक १२ लाख ७२ हजार ६१० लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी १४ एप्रिल रोजी रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ व एक किलो हरभरा किंवा तूरडाळ आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब २० किलो गहू, १५ किलो तांदूळ व एक किलो हरभरा किंवा तूरडाळीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गरीब रेशन कार्डधारकांना अद्याप मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात आले नसून, मे महिन्यात जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारक १२ लाख ७२ हजार ६१० लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटपाचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
एकूण रेशन कार्ड : ४,४३,७३८
बीपीएल : ७०,९३९
अंत्योदय : ४४,८४७
केशरी : १,०६,८१७
मोफत धान्य काय मिळणार?
जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी रेशन कार्डधारकांना मे महिन्यात रास्तभाव दुकानांमधून गहू, तांदूळ व प्रति रेशन कार्ड १ किलो हरभरा डाळ इत्यादी धान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासननिर्णयानुसार जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारक १२ लाख
७२ हजार ६१० लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण मे महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी