रास्त भाव दुकानदारांच्या नकारात अडकली पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:26 PM2019-01-04T12:26:06+5:302019-01-04T12:26:12+5:30
पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदारांनी नकार दिल्याने, जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम अडकले आहे.
- संतोष येलकर
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील गावा-गावांत रास्त भाव दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांकाची पडताळणी सुरू करण्यात आली; मात्र पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदारांनी नकार दिल्याने, जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम अडकले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका क्रमांकाशी आधार क्रमांक संलग्नित (लिंक) असलेल्या शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस मशीन’द्वारे धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक शिधापत्रिका क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानंतर पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांकाची पडताळणी करण्याचे काम जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये गत पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते; परंतु रास्त भाव दुकानदारांकडून पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने विरोध करण्यात आला असून, पडताळणीचे काम पुरवठा विभागामार्फत करण्याची भूमिका रास्त भाव दुकानदार संघटनेने घेतली आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये शिधापत्रिकाधाक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम ठप्प झाले आहे.
जिल्ह्यात असे आहेत लाभार्थी शिधापत्रिकाधारक!
-प्राधान्य गट : १४३५६०
-अंत्योदय योजना : ३५६२७
-एपीएल : ३३८८१
.........................................................
एकूण : २१३०६८
जिल्ह्यात अशी आहेत रास्त भाव दुकाने!
तालुका दुकाने
अकोला शहर १२४
अकोला ग्रामीण १७४
अकोट १६५
बाळापूर ११४
बार्शीटाकळी १२७
मूर्तिजापूर १६३
पातूर ९४
तेल्हारा ९८
...........................................
एकूण १०५९
शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि त्यांचे आधार क्रमांक पडताळणीचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात यावे, रास्त भाव दुकानदारांकडून पडताळणीचे काम करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटेचा विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात रास्त भाव दुकानदारांकडून पडताळणीचे काम ठप्प आहे.
-शत्रुघ्न मुंडे,
जिल्हाध्यक्ष, सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना.