‘रेशन’च्या धान्याचा काळाबाजार; पाच लाखांचा साठा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:54 PM2018-12-01T14:54:22+5:302018-12-01T14:59:00+5:30
अकोला : ‘एमआयडीसी’स्थित ट्रान्सपोर्ट नगरमधील एका खासगी गोदामात बेकायदेशीर साठविण्यात आलेला पाच लख रुपये किमतीचा १५२ क्विंटल ‘रेशन’चा धान्यसाठा जप्त करीत, आरोपीस ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री केली.
अकोला : ‘एमआयडीसी’स्थित ट्रान्सपोर्ट नगरमधील एका खासगी गोदामात बेकायदेशीर साठविण्यात आलेला पाच लख रुपये किमतीचा १५२ क्विंटल ‘रेशन’चा धान्यसाठा जप्त करीत, आरोपीस ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री केली.
अकोला शहरानजीक ‘एमआयडीसी’मधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये सिंधी कॅम्पमधील शीतलदास धर्मदास वाधवानी यांनी भाड्याने घेतलेल्या एका खासगी गोदामात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धाड टाकली असता, गोदामात बेकायदेशीर साठविलेला सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत (रेशन)चा १२५ क्विंटल गहू आणि २७ क्विंटल तूर डाळ असा एकूण १५२ क्विंटल धान्यसाठा आढळून आला. जप्त केलेल्या ‘रेशन’च्या या धान्यसाठ्याची किंमत पाच लाख रुपये असून, जप्त केलेला धान्यसाठा शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आला. खासगी गोदाम भाड्याने घेऊन ‘रेशन’च्या धान्याची बेकायदेशीर साठवणूक केल्याने, आरोपी शीतलदास धर्मदास वाधवानी यास पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर बुंदे, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी अमोल पळसपगार, अजय तेलगोटे, पुरवठा निरीक्षक अरविंद चौगुले, पोलीस कॉन्स्टेबल अश्वीन शिरसाट व आशिष ठाकूर यांनी ही कारवाई केली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एमआयडीसी भागातील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये शीतलदास धर्मदास वाधवानी यांनी भाड्याने घेतलेल्या एका खासगी गोदामात बेकायदेशीर साठविण्यात आलेला अंदाजे पाच लाख रुपये कि मतीचा शासकीय धान्यसाठा आढळला. धान्यसाठा जप्त करण्यात आला असून, आरोपीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
-संतोष शिंदे,
जिल्हा पुरवठा अधिकारी.
रास्त भाव दुकानांची तपासणी करा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश!
एमआयडीसीस्थित ट्रान्सपोर्ट नगरातील खासगी गोदामात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत (रेशन)चा धान्यसाठा कोठून आला, कसा आला, याचा शोध घेण्यासाठी अकोला शहर आणि ग्रामीण भागासह मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील रास्त भाव दुकानांची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना दिला. त्यानुसार शनिवारी रास्त भाव दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे.
असा जप्त करण्यात आला धान्यसाठा!
-गहू : १२५ क्विंटल
- तूर डाळ : २७ क्विंटल