रेशनची माहिती हवी, फक्त ॲपवर क्लीक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:38+5:302021-03-22T04:16:38+5:30
अकाेला : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला ...
अकाेला : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ५७६ शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थींना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. त्यामध्ये आता जिल्हानिहाय धान्याची उचल आणि रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरणही आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी लाभार्थी गेले असेल त्या ठिकाणी त्यांच्या जवळपासच्या दुकानाची माहिती व्हावी, त्या ठिकाणाहून त्यांना लाभ घेता यावा तसेच शिधापत्रिका संदर्भातील माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन रेशनकार्ड योजने अंतर्गत ‘मेरा रेशन’ ॲपचा शुभांरभ केला आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना एका क्लिकवर अद्यावत माहिती मिळणार आहे. मात्र यासाठी लाभार्थ्यांना मेरा रेशन ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे.
गरीब तसेच गरजूंना रेशन मिळावे यासाठी शासनाने गरजूंना शिधापत्रिका दिली आहे. यासाठी लाभार्थ्यांची विभागणी करण्यात आली आहे. विभागणीनुसार लाभार्थ्यांना अन्नधान्य तसेच इतर सुविधा मिळतात. मात्र अनेक वेळा लाभार्थी एका गावातून दुसऱ्या किंवा अन्य राज्यातही जातो. अशावेळी त्याचे हाल होऊ नये, त्यांच्या हक्काचे धान्य, शिधापत्रिकेची अद्यावत माहिती मिळावी यासाठी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना सुरू केली. या माध्यमातून कुठलाही व्यक्ती कोणत्याही ठिकाणाहून लाभ घेऊ शकणार आहे. यासाठी आता ‘मेरा रेशन’ हा मोबाईल ॲपही विकसित करण्यात आला आहे.
या मिळणार सुविधा
लाभार्थ्यांना मिळणारे धान्य
जवळपास असलेले रास्त भाव दुकाने
शिधापत्रिकेवर उचल झालेल्या धान्याची माहिती
शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र
आधार अद्ययावतबाबत माहिती
तक्रार व सूचना करण्याची सोय
‘मेरा रेशन’ ॲपवर लाभार्थ्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत रास्त भाव दुकानातून त्याला त्रास होत असेल, धान्य मिळत नसेल किंवा अन्य माहितीसाठी लाभार्थी आपली तक्रार तसेच सूचनाही नोंदवू शकणार आहे. या तक्रारीचे समाधानही करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुरवठा साखळी व्यवस्थापनांतर्गत धान्याची उचल, रास्तभाव दुकानदारांकडून धान्याची मागणी आणि रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.
बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
एकूण शिधापत्रिकाधारक- ४,३९,७६१
केशरी शिधापत्रिकाधारक- ३,०१,७१२
अंत्योदय शिधापत्रिकाधारक- १,१५,७१२