रेशनच्या तांदळाचा साठा जप्त
By Admin | Published: October 17, 2016 02:52 AM2016-10-17T02:52:57+5:302016-10-17T02:52:57+5:30
गोदामामध्ये आढळल्या ३८६ गोण्या; दोन दिवसांपूर्वी केले होते गोदाम सील.
लोहारा, दि. १६- लोहारा गावातील एका गोदामामध्ये लपविलेला ३८६ कट्टे रेशनचा तांदूळ साठा पुरवठा विभागाने धाड टाकून रविवारी जप्त केला. या तांदूळाची किंमत २ लाख ८६ हजार रुपये एवढी आहे.
लोहारा गावाजवळील डोंगरगाव रोडवर एका शेतातील मोठय़ा गोदामामध्ये शुक्रवारी रेशनचा साठा उतरवित असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकार्यांना देण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी पथकाने गोदामावर धाड टाकली; मात्र पथक गोदामवर पोहोचण्यापूर्वीच ट्रक साठा खाली करून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकार्यांनी गोदाम मालक सुशीलसिंह अनिरुद्धसिंह ठाकूर यांना बोलावल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत न पोहोचल्याने गोदाम सील केले. त्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह बाळापूरचे निरिक्षण अधिकारी सुरेश किर्दक यांच्या पथकाने गोदाम उघडले. यामध्ये असलेला ३८६ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला. या गोदामात अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांमधील रेशनचा तांदूळ आणि गहू नेहमी जमा केला जातो. त्या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी मध्य प्रदेशात पाठविला जातो, अशी माहिती जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्यांसह किर्दक, एम.बी. देशमुख, विनोद वानखडे, दामोदर यांनी ही कारवाई केली. सकाळपासून दुपारपर्यंंत गोदाम परिसरात पत्रकारांना जाण्यावर बंदी होती. बंदद्वार झालेल्या या कारवाईबाबत गावात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.