रेशन दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:38+5:302021-01-08T04:57:38+5:30
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय ...
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थींना नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहिना ५ किलो तांदूळ मोफत दिले. त्यानंतर या योजनेला शासनाने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यासह पाच किलो तांदळाऐवजी लाभार्थींना तीन किलो मोफत गहू व दोन किलो मोफत तांदूळ देण्याचे जाहीर केले. धान्याचे वाटप मोफत होत असल्याने केंद्राकडून आलेल्या अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात रेशन दुकानदारांना कमिशन मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली होती. मागणी शासनाने मंजूर केली होती व रेशन दुकानदारांना प्रतिक्विंटल मागे १५० रुपये कमिशन जाहीर केले होते, परंतु रेशन दुकानदारांनी धान्य वितरण केल्यानंतरसुद्धा त्यांना कमिशनसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
____________
काेराेनासारख्या संकटकालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून धान्याचे वाटप केले. आतापर्यंत कमिशन मिळायला पाहिजे होते. अद्यापही पाच महिन्यांचे कमिशन मिळणे बाकी आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता प्रत्येक तालुक्यातील माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच दुकानदारांच्या खात्यात पैसे टाकल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
कैलास महाजन, कार्यकारी जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, अकोला जिल्हा