रेशनची चणा, उडीद डाळ दुकानांत पोहचलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:17 PM2018-11-12T14:17:24+5:302018-11-12T14:17:54+5:30
वाशिम : दिवाळीला रेशन दुकानांमधून चणा व उडीद डाळ देण्याच्या शासन निर्णयालाच प्रशासकीय यंत्रणेकडून ‘फटाके’ लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दिवाळीला रेशन दुकानांमधून चणा व उडीद डाळ देण्याच्या शासन निर्णयालाच प्रशासकीय यंत्रणेकडून ‘फटाके’ लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिवाळी संपूनही अद्याप रेशन दुकानांत चणा, उडीद डाळ पोहचलीच नाही.
गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानाच्या माध्यमातून अत्यंत कमी किंमतीत धान्य उपलब्ध करून दिलेजाते. यामध्ये तांदूळ, गहू व साखर आदींचा समावेश आहे. गत काही महिन्यांपासून तूर डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. यावर्षीच्या दिवाळीत पहिल्यांदाच चणा व उडीद डाळ वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यासंदर्भात पुरवठा विभाग व संबंधित रेशन दुकानदारांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. पात्र शिधापत्रिकाधारकांची माहितीही मागविण्यात आली. त्या अनुषंगाने रेशन दुकानदारांनी चणा व उडीद डाळीच्या खरेदीसाठी १५ दिवसांपूर्वीच ‘चालान’ही भरले. मात्र, ऐन दिवाळीदरम्यानच चणा, उडीद डाळ रेशन दुकानांपर्यंत पोहचू शकली नाही. दिवाळीपूर्वी चणा व उडीद डाळ उपलब्ध होईल, आशेवर असलेल्या गोरगरीबांचा दिवाळीदरम्यान हिरमोड झाला. प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन कोलमडल्याचा फटका गोरगरीब लाभार्थींना बसला.
असे होते डाळीचे परिमाण
जिल्ह्यातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड १ किलो चना डाळ, १ किलो उडीद डाळ याप्रमाणे वाटप परिमाण निश्चित केले होते. चना व उडीद डाळीचा किरकोळ विक्री दर ३५ रुपये प्रति किलो याप्रमाणे आहे.
चणा, उडीद डाळीसाठी १५ दिवसांपूर्वी चालान भरण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी चणा डाळ गोदामात आली आहे. आता सदर डाळ रेशन दुकानापर्यंत पोहचविण्यात येईल. उडीद डाळ अद्याप रेशन दुकानात आली नाही.
- प्रभाकरराव काळे,
जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, वाशिम