उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आता ऑनलाइन!
By admin | Published: December 12, 2015 02:42 AM2015-12-12T02:42:50+5:302015-12-12T02:42:50+5:30
अमरावती विद्यापीठात हिवाळी-२0१५ परीक्षेपासून प्रक्रिया सुरू.
प्रवीण खेते/अकोला : परीक्षेचे पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना हेलपाटे घ्यावे लागत असल्याने अमरावती विद्यापीठाने ही प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला हिवाळी-२0१५ परीक्षेपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी विभागातील विद्यार्थ्यांना वारंवार अमरावतीला जाण्याची गरज राहणार नाही. परीक्षेच्या निकालानंतर अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षेचे पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांची होणारी धावपळ पाहता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत परीक्षेचे पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेला विद्यापीठाच्या हिवाळी-२0१५ परीक्षेपासून सुरुवात करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पुनर्मूल्यांकन तसेच उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळवायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून, त्यामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल अँड्रेस अचूक समाविष्ट करावा, विद्यार्थ्यांनी लॉग-इन करून संबंधित आवेदनपत्र निवडावे. यानंतर त्यासाठी लागणार्या शुल्काबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेच्या धनाकर्षाद्वारे (डी.डी.) किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत ह्यपॉवर ज्योतीह्ण खाते क्रमांकामध्ये प्रत्यक्ष चालानद्वारे शुल्क भरावे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदन भरल्यानंतर विद्यार्थ्यांंनी सदर पत्रासोबत अर्जासाठी छापील पत्र, मूळ गुणपत्रिका व शुल्क भरणा केल्याच्या मूळ पावतीसह विद्यापीठात प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे पाठविणे आवश्यक राहणार आहे.