म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना रिॲक्शन; इंजेक्शनचा वापर थांबविला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:04+5:302021-07-02T04:14:04+5:30
अकोल्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना जडलेल्या बुरशीचा फैलाव होऊ नये या अनुषंगाने रुग्णांना ॲन्टी ...
अकोल्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना जडलेल्या बुरशीचा फैलाव होऊ नये या अनुषंगाने रुग्णांना ॲन्टी फंगल म्हणून ‘एएनजी, एचबीपीसीएल आणि लायका’ या कंपनीचे इंजेक्शन दिली जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणामही रुग्णांवर दिसून आला. मात्र या इंजेक्शनच्या एका लॉटच्या वापरादरम्यान रुग्णांना रिॲक्शन आल्याचे निदर्शनास आले. अकोल्यासह विदर्भात नागपूर, अमरावती जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार निदर्शनास आल्याची माहिती आहे. इंजेक्शनच्या वापरानंतर होणाऱ्या रिॲक्शनची कारणे जाणून घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून इंजेक्शनचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही, तोवर या इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नातेवाईकांकडून नकार
उपचारादरम्यान इंजेक्शनमुळे रिॲक्शन होत असल्याने या इंजेक्शनचा रुग्णावर वापर करू नये, असा आग्रह रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना तसे लेखी लिहून दिल्याची माहिती आहे.
नव्या लॉटचा वापर सुरू
अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात या इंजेक्शनचा नवीन लॉट आला असून, त्याचा उपयोग केला जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नवीन लॉटच्या वापरानंतर रिॲक्शन येण्याचा प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रिॲक्शनची सामान्य लक्षणे
ताप
थंडी वाजून येणे
म्युकरमायकाेसिससाठी प्रभावी असलेल्या ॲन्टीफंगलच्या वापरादरम्यान काही रुग्णांना रिॲक्शन आल्याचे आढळून आले. या इंजेक्शनचा वापर थांबविण्यासंदर्भात शासनाकडून कुठलेही निर्देश प्राप्त झाले नाहीत. मात्र, नियमाप्रमाणे त्याचा वापर थांबविण्यात आला. या लॉटमधील इंजेक्शनच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने घेण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दुसऱ्या लॉटमधील इंजेक्शनचा वापर करण्यात येत असून, त्याची कुठलीही तक्रार आली नाही.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला