स्पर्धा परीक्षेत दिव्यांगांना वाचक, लेखनिक बँकेची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:28 PM2019-03-26T13:28:51+5:302019-03-26T13:29:10+5:30
अकोला: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा ०१९ रविवारी राज्यभरात पार पडली. या परीक्षेला बसणाऱ्या अंध परीक्षार्थींसाठी दिव्यांग आर्ट गॅलरीच्या वाचक व लेखनिक बँकेने वाचक व लेखनिक पुरवून दिव्यांगांना मदत केली.
अकोला: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा ०१९ रविवारी राज्यभरात पार पडली. या परीक्षेला बसणाऱ्या अंध परीक्षार्थींसाठी दिव्यांग आर्ट गॅलरीच्या वाचक व लेखनिक बँकेने वाचक व लेखनिक पुरवून दिव्यांगांना मदत केली. उपक्रमांतर्गत अकोल्यातील दोन दिव्यांगांना या मदतीचा लाभ मिळाला.
दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे राज्यातील पहिलीच लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना वाचक व लेखनिक नि:शुल्क उपलब्ध होत आहेत. रविवारी झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेसाठीदेखील उपक्रमांतर्गत राज्यभरात वाचक व लेखनिक पुरविण्यात आले. अकोल्यातील आरडीजी महिला महाविद्यालयात या परीक्षासाठी दहा दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत वाचक व लेखनिक पुरविण्यात आले. यावेळी लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँकची सदस्य सुरभी दोडके हिने लेखनिक म्हणून मदत केली. १५० स्वयंसेवकांनी या बँकेचे कार्य आपल्या खांद्यावर घेतले आहे. यामध्ये वैष्णवी गोतमारे, नचिकेत बडगुजर, जया देव, गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, दिव्या शर्मा, संध्या प्रजापती, पूजा वाकडे, अक्षय राऊत, अंकुश काळमेघ व वैशाली सोनकर आदी स्वयंसेवक वाचक व लेखनिक म्हणून कार्यरत असून, अंध बांधवांसाठी विविध परीक्षेसाठी अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करीत आहेत. बँकेचे सदस्य होण्यासाठी वयाची कोणतीही अट नसून, दिव्यांग बांधवांना मदत करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखक व वाचक हवा आहे, अशा दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिव्यांग आर्ट गॅलरीचे प्रा. विशाल कोरडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.