मतदान साहित्य वितरणाची तयारी पूर्ण; मतदान पथके रविवारी होणार रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:21 PM2019-10-19T13:21:56+5:302019-10-19T13:22:01+5:30
मतदान पथकांना मतदानाचे साहित्य वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी रविवार, २० आॅक्टोबर रोजी मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना होणार असून, मतदान पथकांना मतदानाचे साहित्य वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी २० आॅक्टोबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. त्यानुषंगाने मतदान पथकांना मतदान साहित्य वितरणाची तयारी पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट सोबतच मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, मतांची हिशोब पत्रिका, अभिरूप मतदान प्रमाणपत्र, मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची व बंद झाल्याची नोंदवही, प्रदत्त मतपत्रिका, मतदान केंद्र भेटपुस्तिका, चिन्हांकित मतदार यादी यासह इतर अनुषंगिक साहित्य मतदान पथकांसोबत पाठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
अकोला पूर्व मतदारसंघात ‘सखी’ व ‘दिव्यांग’ मतदान केंद्र!
अकोला पूर्व मतदारसंघात शहरातील सीताबाई कला महाविद्यालयात मतदान केंद्र क्रमांक २१४ येथे महिला मतदारांसाठी ‘सखी’ मतदान केंद्र आणि मतदान केंद्र क्रमांक २१७ येथे दिव्यांग मतदारांसाठी ‘दिव्यांग’ मतदान केंद्र राहणार आहे, असे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले.