Ganesh festival : गणरायांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:51 PM2018-09-12T12:51:20+5:302018-09-12T12:55:38+5:30
वाशिम : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांची गुरूवार, १३ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांची गुरूवार, १३ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत. यावर्षी १३ पोलीस स्टेशन परीक्षेत्रात एकूण ६९४ गणेश मंडळांकडून ‘बाप्पा’ची विधिवत स्थापना केली जाणार आहे.
घरगुती गणरायांसोबतच सार्वजनिक गणेश मंडळे गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शहरात गणरायांचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. या उत्सवादरम्यान शांतता तसेच कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवला जाणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथक, एक अतिजलद प्रतिसाद पथक, चार चिडीमार विरोधी पथक, एक अँटी गुंडा पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज असल्याचा दावा पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनान केला. वाशिम शहरात रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसून, गणेशभक्तांनी विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची ‘बुकिंग’ केलेली आहे. यावर्षी शहरी भागात २५२ आणि ग्रामीण भागात ४४२ असे एकूण ६९४ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायांची स्थापना केली जाणार आहे.
गणरायांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हावासी सज्ज असून, बुधवारी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथील बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या. विविध साहित्याच्या खरेदीसाठी भाविकांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.