शेतीपूरक उद्योगांवर भर देण्याचीच खरी गरज
By admin | Published: December 30, 2014 01:09 AM2014-12-30T01:09:27+5:302014-12-30T01:09:27+5:30
सुधीरकुमार गोयल यांचे प्रतिपादन : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप.
अकोला : शेतकर्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची खरी गरज आहे. शासन, कृषी विद्यापीठाच्या विविध योजना यासाठी उपलब्ध आहेत. त्या शेतकर्यांपर्यंत नेण्याची जबाबदारी कृषी विस्तार विभागाने पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केले.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडागंणावर तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी डॉ. गोयल बोलत होते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या विद्यापीठाने शेतकर्यांसाठी नवे संशोधन, तंत्रज्ञान, कमी पाण्याची-खर्चाची शेती यांचे भांडार खुले केले. शेतकर्यांनी हा खजिना येथून नेऊन शेतीच्या विकासाकरिता वापरण्याची गरज असल्याचे डॉ. गोयल म्हणाले. यांसह शेतीला पूरक जोडधंद्यासाठी दुग्धोपादन, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्रांचा शेतीतील विविध कामांसाठी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर दर्यापूरचेआमदार रमेश बुंदेले, त्यांच्या पत्नी वीणा बुंदेले, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले आदींची उपस्थिती होती.