साठय़ात काळा बाजाराची पाळेमुळे
By admin | Published: October 17, 2016 02:51 AM2016-10-17T02:51:57+5:302016-10-17T02:51:57+5:30
लोहारा येथील साठा पोषण आहाराचा की पुरवठा विभागाचा.
अकोला, दि. १६- तांदळाचा काळा बाजार करणार्या माफियांचे जिल्हय़ात सर्वत्र जाळेच असल्याचे लोहारा येथे आढळलेल्या साठय़ामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जप्त केलेला १८३ क्विंटल तांदूळ शालेय पोषण आहाराचा की शिधापत्रिकाधारकांचा यावरून पुरवठा विभागाच्या कारवाईचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे याबाबत बाळापूरचे नायब तहसीलदार सुरेश किर्दक यांनी उरळ पोलिसांत तक्रार केली आहे.
जिल्हय़ाच्या आकोट व तेल्हारा तालुक्यांतून स्वस्त धान्याचा मोठय़ा प्रमाणात अपहार झाल्याच्या घटना लगतच्या काळात उघड झाल्या आहेत. त्याशिवाय, पातूर तालुक्यातील आलेगाव व खेट्री या गावांतही पोषण आहाराच्या तांदळाचा मोठय़ा प्रमाणात साठा करून मेहकर तालुक्यातील माफियांना विकला जातो. तेथेही माफियांवर कारवाई झाली आहे. तांदळाच्या अवैध साठय़ाच्या घटना पाहता त्यामध्ये शालेय पोषण आहार आणि सार्वजनिक वितरण प्रणालीच्या योजनांचा तांदूळ असतो; मात्र तांदूळ नेमका कोणाचा, हे तत्काळ ठरविता येत नाही. त्यामुळेच लोहारा येथे आढळून आलेल्या तांदळाबाबत ही बाब प्रथमदर्शनी स्पष्ट होत नाही. त्यामुळे आरोपी सुशीलकुमार सिंघेल याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास रेशन माफियांचे जाळेच उघड होण्याची शक्यता आहे.
शेगाव, तेल्हारा तालुक्यांतील तांदूळ
जप्त केलेला तांदूळ हा शासकीय योजनांचा असल्याचा पुरवठा विभागाचा विश्वास आहे. शालेय पोषण आहार, सार्वजनिक वितरण प्रणालीचा हा तांदूळ बाळापूरसह लगतच्या शेगाव, तेल्हारा तालुक्यांतून जमा केलेला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातील तथ्य आता पोलिसांना पुढे आणावे लागणार आहे.
तालुक्याच्या उपकंत्राटामुळे काळा बाजार
शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा तालुकानिहाय उपकंत्राटदारामार्फत पुरविला जातो. त्यापैकी काहींनी कंत्राटाच्या आड तांदळाचा काळा बाजार करण्याचा धंदाच सुरू केलेला आहे. सोबतच जिल्हय़ातील काही स्वस्त धान्य दुकानदारांकडूनही तांदळाचा काळा बाजार होतो. त्या सर्वांचा तांदूळ एकत्र करून योग्यवेळी विल्हेवाट लावली जाते. त्यांच्यावर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली; मात्र नंतर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.