मांस विक्रेत्यानेच केली होती महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना
By admin | Published: October 22, 2016 02:48 AM2016-10-22T02:48:24+5:302016-10-22T02:48:24+5:30
चांगेफळ पैसाळी येथील हल्ला प्रकरणातआरोपीला एक दिवसाची कोठडी.
अकोला, दि. २१- चांगेफळ पैसाळी येथे महापुरुषांच्या विटंबनेवरून झालेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणानंतर पोलिसांनी अटक केलेल्या ४५ आरोपींमधील योगेश जाधव नामक मांस विक्रेत्या आरोपीनेच महापुरुषांच्या प्रतिमेवर शाई फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जाधवने या प्रकाराची पोलिसांसमोर कबुली दिली असून, त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. चांगेफळ पैसाळी या गावात योगेश जाधव याने मांस विक्रीचे दुकान लावले होते. या दुकानाला गावातील महिलांनी विरोध केल्यानंतर त्याला दुकान हटवावे लागले; मात्र याचा रोष चांगेफळ पैसाळीवासीयांवर काढण्यासाठी योगेश जाधवने येथील एका महापुरुषांच्या फलकावर शाई फेकून दोन गावांत आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न यशस्वीही झाला. महापुरुषांच्या प्रतिमेवर चांगेफळ पैसाळी येथील ग्रामस्थांनी शाई फेकल्याच्या संशयावरून १00 ते १५0 लोकांनी या गावावर सशस्त्र हैदोस घातला होता. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ७0 च्यावर हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करून यामधील ४५ आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी करून त्याला पोलिसी खाक्या दाखविताच योगेश जाधवने महापुरुषांच्या प्रतिमेवर शाई फेकल्याची कबुली दिली. त्याच्या या अश्लाघ्य प्रकारामुळे दोन समाजातच नव्हे, तर संपूर्ण जिल्हय़ात दंगली भडकण्याची शक्यता होती; मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत प्रकरणाच्या सूत्रधाराचा पर्दाफाश केल्याने शांतता प्रस्थापित करण्यास मदत झाली. योगेश जाधव याला पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.