ज्येष्ठ नेत्यांचे बंडाचे निशाण; जिल्हा अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:40 PM2020-01-03T12:40:21+5:302020-01-03T12:41:38+5:30
एका माजी आमदाराने जिल्हा परिषदेच्या एका गटातील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, याचे उदाहरणही पुढे आले आहे.
अकोला : भारिप-बमसंच्या अधिकृत उमेदवारांऐवजी अपक्षांचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षविरोधी कारवायांची गंभीर दखल घेतली जात आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा, अशा सूचना पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी अध्यक्ष प्रभा सिरसाट यांनी पत्राद्वारे गुरुवारी दिल्या आहेत. एका माजी आमदाराने जिल्हा परिषदेच्या एका गटातील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, याचे उदाहरणही पुढे आले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इच्छुकांना भारिप-बमसंची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी पसरली. त्यापैकी काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना आवरण्यासाठी पक्षाने त्रिसदस्यीय समितीकडे जबाबदारी दिली. समितीने अनेकांची मनधरणी केली. त्यापैकी काहींनी माघार घेतली, तर उगवा, बोरगाव मंजू, हातगाव व बाभूळगाव या गटांतील अपक्ष आहेत. त्या अपक्षांचा प्रचार काही ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केला. हा प्रकार पक्षविरोधी आहे. त्यामुळे त्या ज्येष्ठ नेत्यांच्या कारवायांची दखल पक्ष स्तरावर घेण्यात आली आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांनीही इतरांच्या बंडखोरीला प्रोत्साहन न देता पक्षासोबत राहावे, अशा सूचनाही पत्रातून देण्यात आल्या.
चार गटांतील उमेदवारांची धाकधूक
जिल्हा परिषदेच्या चार गटांतील उमेदवारांना विजयापासून रोखण्यासाठी पक्षाच्या माजी आमदाराने कारवाया सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये बाभूळगाव, चांदूर, घुसर, कुटासा या गटांत पक्षविरोधी कारवाया होऊ शकतात, त्याची दखलही घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.