नेत्रदाता परिजन व कोरोना योध्दांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:23 PM2020-10-18T17:23:02+5:302020-10-18T17:23:12+5:30
Corona Warriors, Sanjay Dhotre केन्द्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते नेत्रदाता परिजन सन्मान व कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला.
अकोला : नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून नागरिकांनी नेत्रदानासोबत देहदानही करावे, असे आवाहन केन्द्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले. अकोला येथील नेत्र कमलाजंली चॅरिटेबल हॉस्पीटल व प्रसृतीगृह अंतर्गत अकोला नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केन्द्र येथे केन्द्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते नेत्रदाता परिजन सन्मान व कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, महापौर अर्चनाताई मसने व नेत्र कमलाजंली चॅरिटेबल हॉस्पीटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंदकांत पनपालीया यांची प्रमुख उपस्थिती होती. नेत्र कमलाजंली चॅरिटेबल हॉस्पीटलचे काम कौतुकास्पद असून आतापर्यंत तीन हजाराच्यावर लोकाना या ट्रस्टव्दारे दृष्टिलाभ झाला आहे. ही अभिमानाची बाब असून अशा प्रकारचे कार्य निरंतर, सतत सुरु ठेवावे, असे सांगून कोरोनाच्या काळात या हॉस्पीटलव्दारे करण्यात आलेले प्रसृतीविषयक काम गौरवास्पद असून तसेच येथील वैद्यकीय चमूनी वैद्यकीय सेवेसह इतरही समाजोयोगी सेवा केल्याबद्दल अकोलेकर नेहमी त्यांचे ऋणी राहील, असे विचार ना. धोत्रे यांनी व्यक्त केले. यावेळी नेत्रदान व देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या परिजनाचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रकाश सोमानी यांनी आपल्या मातापिताचे नेत्रदान व देहदान करुन जनतेसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. या कार्यक्रमात कोरोना काळात कोरोना यौध्दा म्हणून काम करणाऱ्या डॉ. अवंती व उपेंद्र कंजारकर, डॉ. सपना व श्याम पनपालिया, डॉ. अर्पणा वाहने, डॉ. अशोक चोपडे, डॉ. जहागिर हूसेन, डॉ. निखिल महाजन, डॉ. विलास गावंडे तसेच हॉस्पीटलचे नर्सेस व कर्मचारी यांचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आले. या व्यतिरिक्त सुनिल कोरडीया, जावेद जकेरिया, अनिल चांडक, शरद चांडक, रांदळ यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉ. चंदकांत पनपालिया यांनी केली तर उपस्थितांचे आभार रांदळ यांनी मानले.