‘त्या’ जागेवर धार्मिक स्थळाची पुन्हा उभारणी
By admin | Published: June 18, 2017 02:10 AM2017-06-18T02:10:24+5:302017-06-18T02:10:24+5:30
सिटी कोतवालीसमोरील प्रकार; स्थळ निरीक्षणाचे निर्देश.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर नव्याने धार्मिक स्थळाची उभारणी केली जात असल्याचा प्रकार सिटी कोतवालीसमोर उजेडात आला आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांना स्थळ निरीक्षणाचे निर्देश दिले आहेत.
शहरात अनेक पुरातन धार्मिक स्थळे आहेत. गत दहा वर्षांंमध्ये जागा दिसेल, त्या ठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी करण्याचा नागरिकांनी सपाटा लावल्याचे दिसून येते. शासकीय जागा, मुख्य रस्ते व गल्लीबोळात पूज्य व्यक्ती-संतांच्या प्रतिमा व पुतळे उभारले आहेत. रात्री-अपरात्री अशा धार्मिक स्थळांची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अनेकदा अप्रिय घटना घडल्या आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी धार्मिक स्थळांच्या नोंदी घेत पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेली ५६ स्थळे हटविण्याची कारवाई केली. त्यानंतर २00९ पूर्वी उभारलेल्या; परंतु रस्त्यांलगत असलेल्या २२२ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये सिटी कोतवालीसमोरील लोखंडी पुलाजवळ असलेल्या दोन धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई महिनाभरापूर्वी पार पडली होती. क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांच्या उपस्थितीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांनी धार्मिक स्थळ हटविले. त्यावेळी सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे जातीने उपस्थित होते. दोन धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ स्वत:हून हटविणार असल्याची विनंती काही नागरिकांनी केल्यामुळे त्यांना एक दिवसाचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर या धार्मिक स्थळाकडे मनपाने फिरकूनही पाहिले नाही. त्याचे परिणाम समोर आले असून, मागील काही दिवसांपासून या ठिकाणी नव्याने धार्मिक स्थळाची उभारणी केली जात आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना स्थळ निरीक्षणाचे निर्देश दिले आहेत.
लोखंडी पुलाजवळून मोठा नाला वाहतो. नाल्याच्या जागेत अतिक्रमण करून दोन धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणे अपेक्षित नाही. अतिक्रमण हटविण्यासोबतच संबंधितांविरुद्ध फौजदारी तक्रार केली जाईल.
-अजय लहाने, आयुक्त मनपा.