पदांअभावी रखडली ‘पीजी’ अभ्यासक्रमाची मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:31 AM2021-01-19T10:31:52+5:302021-01-19T10:32:44+5:30

Akola GMC News पदांना मंजुरीच नसल्याने ‘एमसीआय’मार्फत बालरोगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली नाही.

Recognition of 'PG' course stalled due to lack of posts! | पदांअभावी रखडली ‘पीजी’ अभ्यासक्रमाची मान्यता!

पदांअभावी रखडली ‘पीजी’ अभ्यासक्रमाची मान्यता!

Next

अकोला : बालरोगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने काही महिन्यांपूर्वी ‘एमसीआय’कडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, अभ्यसक्रमासाठी आवश्यक पदांना मंजुरीच नसल्याने ‘एमसीआय’मार्फत बालरोगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली नाही. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विदर्भातील महत्त्वाचे वैद्यकीय महाविद्यालय असून येथे वैद्यकीय शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पदवीसोबतच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देखील जीएमसी प्रशासनही नेहमीच प्रयत्नशील राहते. त्यामुळेच मागील तीन वर्षांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली. इतर अभ्यासक्रमासोबतच बालरोगशास्त्र विषयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे २०२० मध्येच एमसीआयकडे प्रस्ताव पाठविला हाेता. त्यानंतर एमसीआयच्या पथकाद्वारे महाविद्यालयात उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यात आली. यापूर्वीही पाच ते सहा वेळा एमसीआयकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे. दरम्यान महाविद्यालयात बालरोगशास्त्र विभागामध्ये आवश्यक पदांना मंजुरीच नसल्याचे समोर आले. महाविद्यालयात या विषयासाठी पदेच मंजूर नसल्याने एमसीआयमार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

 

या पदांना नाही मंजुरी

सर्जरी

ॲनेस्थिशिया

पेडिॲट्रिक

मेडिसिन

 

या सात विषयांना पदांअभावी मान्यता नाही

औषध वैद्यकशास्त्र

शल्यचिकित्साशास्त्र

अस्थिव्यंगोपचारशास्त्र

मनोविकृतीशास्त्र

बधिरीकरणशास्त्र

क्ष-किरणशास्त्र

बालरोगशास्त्र

 

जिल्हा स्त्री रुग्णालयातही प्राध्यापक नाही

बालरोगशास्त्र विषयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता मिळावी म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालयाची मदत घेणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या विचाराधीन हाेते. मात्र, या विषयात जिल्हा स्त्री रुग्णालयातही प्राध्यापकांची पदे नसल्याने जीएमसी प्रशासन जिल्हा स्त्री रुग्णालयाची मदत घेऊ शकले नाही.

 

आतापर्यंत १३ विषयांना मिळाली मान्यता

शरीरशास्त्र, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, शरीरविज्ञान, जीवरसायनशास्त्र, फॅरेन्सिक, मेडिसिन ॲन्ड टेक्सोलॉजी, औषधविज्ञान, पॅथॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, पीएसएम, क्षयरोग आणि छातीरोग, नेत्रविज्ञान, नाक-कान-घसा व त्वाचारोग आदी विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.

 

बालरोगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एमसीआयकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक पदांना अकोला जीएमसीत पदांना मंजुरी नसल्याने सध्या मान्यता मिळू शकली नाही. पदांना मान्यता मिळाल्यास या विषयातही महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होईल.

- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी

Web Title: Recognition of 'PG' course stalled due to lack of posts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.