भुईमुग वाणाच्या संशोधनासाठी सामंजस्य करार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:28 AM2020-07-04T10:28:42+5:302020-07-04T10:29:03+5:30
हा करार तीन वर्षांसाठी असून, या अंतर्गत भुईमुगाचा वाण ‘टीएजी-७३’ची विद्यापीठ स्तरावर शिफारस करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भाभा अणुसंशोधन केंद्रांमध्ये झालेल्या बैठकीत बियाण्यांच्या उत्पादनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार तीन वर्षांसाठी असून, या अंतर्गत भुईमुगाचा वाण ‘टीएजी-७३’ची विद्यापीठ स्तरावर शिफारस करण्यात आली. हे वाण मंजुरीसाठी महाराष्ट्र संशोधन परिषदेकडे पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विद्यापीठातर्फे देण्यात आली.
कृषी संशोधन सामंजस्य करारासंदर्भात २६ जून रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत झालेल्या सामंजस्य करारानुसार दोन्ही संस्था एकत्रित येऊन बियाण्यांचे संशोधन करणार आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोहरीचा ‘टीएम-१०८-१’ हा वाण विकसित केला होता. त्यानंतर भुईमुगाच्या ‘टिएजी-७३’ या वाणाची शिफारस विद्यापीठ स्तरावर करण्यात आली असून, ते मंजुरीसाठी महाराष्ट्र संशोधन परिषदेकडे सादर केले आहे. पैदासकार बियाण्यांच्या उत्पादनासोबतच वेगवेगळ््या बीजोत्पादन संस्थांना बियाणे पुरवठा करण्यावरही भर दिला जाणार आहे. यापूर्वी प्रामुख्याने टीएजी-२४ (भुईमुग), टीएयु-१ (उडीद) व पीडीकेव्ही तारा (तूर) इत्यादी वाणांचा मोठा प्रसार झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी सामंजस्य करारांतर्गत अधिक उत्पादन, लवकर तयार होणाºया, पाण्याचा ताण सहन करणाºया, बदलत्या हवामानात टिकाव धरणाºया वाणांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. या सामंजस्य करारासाठी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे गट संचालक डॉ. एस.के. घोष व डॉ. पी. सुप्रन्ना यांनी मार्गदर्शन केले. या सामंजस्य करारासाठी डॉ. आर.बी. घोराडे, डॉ. ई.आर. वैद्य, डॉ. आर.एन. काटकर, डॉ. आर.डी. रत्नपारखी, सचिन शिंदे यांनी सहकार्य केले.
बदलत्या हवामानानुसार करणार संशोधन
सामंजस्य करारांतर्गत विदर्भातील बदलते कृषी हवामान आणि भविष्यातील आवश्यकतेनुसार संशोधन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अधिक उत्पादन, लवकर तयार होणाºया, पाण्याचा ताण सहन करणाºया, बदलत्या हवामानात टिकाव धरणारे वाणांच्या विकासावर भर राहणार आहे.
हुरड्यासाठी ज्वारीचा नवे वाण प्रस्तावित!
दोन वाणाच्या यशस्वी उत्पादनानंतर विद्यापीठाने ज्वारीचा ‘टीएकेपीएस-५’ हा वाण हुरड्यासाठी प्रस्तावित केला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यातील करारानुसार, या काळात हवामानातील बदलानुसार वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
- प्रा. डॉ. ई.आर. वैद्य,
कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, पीडीकेव्ही, अकोला.