अँन्टी गुंडा स्क्वॉडची पुनर्रचना
By admin | Published: November 6, 2014 01:05 AM2014-11-06T01:05:00+5:302014-11-06T01:36:44+5:30
अकोला जिल्ह्यातील अँन्टी गुंडा स्क्वॉडमध्ये पाच नव्या कर्मचा-यांची एन्ट्री.
अकोला: अल्लू पहेलवान ऊर्फ अलियार खान याच्यासोबत आर्थिक व्यवहार केल्याच्या कारणावरून सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी तत्कालिन शहर पोलिस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनी सुरू केलेले अँन्टी गुंडा स्क्वॉडची पुनर्रचना करून गत चार वर्षांपासून काम करणार्या पोलिस कर्मचार्यांना बदलून स्क्वॉडमध्ये पाच नव्या कर्मचार्यांना एन्ट्री दिली. या स्क्वॉडमधील पोलिस कर्मचार्यांनी पहिल्याच दिवशी दोन जुगारांवर छापे घालून दोन आरोपींना अटक केली.
२0११ मध्ये तत्कालीन शहर पोलिस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनी त्यांच्या देखरेखीखाली अँन्टी गुंडा स्क्वॉड सुरू केले. या स्क्वॉडमध्ये त्यांनी महेंद्र बहादूरकर, विलास बंकावार, संतोष गवई, अब्दुल फईम यांची नियुक्ती केली. त्यानंतर शहर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी स्क्वॉड कायम ठेवला आणि स्क्वॉडमधील जुन्याच कर्मचार्यांवर विश्वास टाकला. पुढे काही महिन्यानंतर संतोष गवई, अब्दुल फईम यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्याने त्यांच्या जागेवार सुरज चिंचोळकर, असद खान, शक्ती कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव यांच्या बदलीनंतर आयपीएस दर्जाचे अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे यांनी सूत्रे स्वीकारली. त्यांनीही हा स्क्वॉड कायम ठेवला; परंतु अवैध सावकारी प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर अल्लू पहेलवान याने अँन्टी गुंडा स्क्वॉडमधील सदस्यांनी, त्याच्याकडून ४ लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला. ही बाब पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कानावर गेल्याने त्यांनी गंभीर दखल घेत, डॉ. मुंढेंना स्क्वॉड बरखास्त करण्याचे आदेश दिले. डॉ. मुंढे यांनी स्क्वॉड बरखास्त करून त्याची पुनर्रचना केली आणि स्क्वॉडमध्ये पीएसआय जयबीरसिंह ठाकूर, शक्ती कांबळे, राहुल वाघ, रोहित तिवारी आणि हर्षल देशमुख यांची नियुक्ती केली.