अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा

By रवी दामोदर | Published: March 5, 2024 06:44 PM2024-03-05T18:44:11+5:302024-03-05T18:58:35+5:30

६ हजार रुपयांवर प्रतिक्विंटल भाव : एकाच दिवशी साडेचार हजार क्विंटलची आवक

Record arrival of gram in Akola Bazar Samiti; Queues of vehicles | अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा

अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा

अकोला: रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरुवात झाली असून, नवीन हरभरा बाजारात दाखल होत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, दि.५ मार्च रोजी एकाच दिवशी हरभऱ्याची ४ हजार ७९० क्विंटलची विक्रमी आवक झाली असून, सायंकाळपर्यंत वाहनांच्या रांगा पहावयास मिळाल्या. खुल्या बाजारात हरभऱ्याला चांगले दर असल्याने शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ९०० ते ६ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरभऱ्याची सोंगणी सुरू असून, सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल तयार आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर चांगले असल्याने शेतकरी विक्रीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामामध्ये निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. त्यात रब्बी हंगामातही हरभरा पीक फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. सध्या हरभरा काढणीला सुरुवात झाली असून, नवीन हरभरा बाजारात दाखल झाला आहे. दर वधारल्याने शेतकरी खुल्या बाजारात मालाची विक्री करत आहेत. परिणामी बाजारात आवक वाढली आहे.

आज हरभरा स्वीकरला जाणार नाही
बाजार समितीमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या प्रांगणात हरभरा उतरविण्यासाठी जागाच नसल्याने बुधवार, दि. ६ मार्च रोजी हरभरा शेतमालाची वाहने बाजार समितीत स्वीकारली जाणार नसल्याची माहिती आहे. बाजार समिती प्रशासनाद्वारे अडत्यांना यासंदर्भात सूचित करण्यात आल्याची माहिती आहे.

बाजार समितीच्या प्रांगणात वाहनांच्या रांगा

बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढल्याने अनेक वाहने प्रांगणात उभी करण्यात आली. मंगळवारी तब्बल १०० वर वाहने प्रांगणात उभी असल्याचे दिसून आले. बाजार समिती प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी व संबंधित वाहनचालकांना सकाळ ते सायंकाळपर्यंत ताटकळत बसावे लागले. सायंकाळपर्यंतही शेतमाल उतरविण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

Web Title: Record arrival of gram in Akola Bazar Samiti; Queues of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला