वाहतूक शाखेने केला कारवायांचा रेकाॅर्ड ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:36+5:302020-12-31T04:19:36+5:30
अकाेला : वाहतूक शाखेने २०२० या वर्षभरात कारवायांचा रेकाॅर्ड ब्रेक करीत सुमारे ७३ हजार ५०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. ...
अकाेला : वाहतूक शाखेने २०२० या वर्षभरात कारवायांचा रेकाॅर्ड ब्रेक करीत सुमारे ७३ हजार ५०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या माध्यमातून तब्बल ७२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल १४ हजार कारवाया जास्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत अमरावती विभागात अव्वल
२०२० ह्या मावळत्या वर्षात शहर वाहतूक शाखेने कारवाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून, अकाेला वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंतच्या सर्वांत जास्त कारवाया केल्या आहेत. २०२० ह्या वर्षी एकूण ७३ हजार ५०० वाहनांवर दंडात्मक कारवाया करून ७२ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. रेकाॅर्ड ब्रेक कारवाया केल्याने अमरावती विभागात अकाेला शहर वाहतूक शाखा प्रथम आहे.
गतवर्षीपेक्षा तब्बल १४ हजार कारवाया जास्त
शहर वाहतूक शाखेने मागील २०१९ ह्या वर्षी ५९ हजार ५४० वाहनांवर दंडात्मक कारवाया केल्या होत्या, मागील वर्षीपेक्षा ह्या वर्षी तब्बल १४ हजार कारवाया जास्त करण्यात आल्या आहेत.
सामाजिक उपक्रम राबविण्यातही अग्रेसर
सरत्या वर्षात सामाजिक उपक्रमसुद्धा राबविले. यामध्ये काेरोना लॉकडाऊन काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एक कॉल करा, मदत मिळवा’ ही मोहीम यशस्वीरीत्या राबवून अनेक ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय मदत, वाहने, रेशन व आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. ऑटो बंद असल्याने उपासमार होत असलेल्या काही आजारी व गरीब ऑटोचालकांना रेशनवाटप केले.
वाहतूक शाखेने केली जागृती
जनजागृती करण्यासाठी ‘नो मास्क - नो फ्युएल’, ‘नो मास्क - नो बुक्स’, ‘नो मास्क - नो डील’, ‘नो मास्क - नो रेशन’, ‘नो मास्क - नो सवारी’, ‘नो मास्क - नो राईड’ ह्या मोहिमा यशस्वीपणे राबविल्या. त्यापैकी ‘नो मास्क - नो सवारी’ ह्या उपक्रमाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कौतुक करून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे निर्देश दिले.
रक्तदानात कुटुंबीयांचाही सहभाग
कोरोना काळामुळे रक्ताची कमतरता लक्षात घेऊन पोलीस अंमलदार व कुटुंबीयांचे रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करून शासनाच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद दिला. वर्षभर पोलीस अधीक्षकांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने धडक कारवाया व सामाजिक उपक्रम ह्या दोन्ही आघाडींवर भरीव कामगिरी केली.