‘पणन’ची यावर्षी विक्रमी कापूस खरेदीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 01:52 PM2019-12-06T13:52:13+5:302019-12-06T13:56:00+5:30
पनण महासंघाचे ३४ केंद्रावर १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : गत पाच वर्षात कापसाची नाममात्र खरेदी करणाऱ्या महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची यावर्षी विक्रमी खरेदीकडे वाटचाल सुरू असून, गत पाच दिवसात १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आला आहे. आधारभूत किमतीने शेतकऱ्यांना आतापर्यंत १५ कोटी रुपयांचे चुकारेही करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.
आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकºयांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकºयांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ५० पैकी ३४ खरेदी केंद्रच सुरू करण्यात आले आहेत. याच ३४ केंद्रावर गत पाच दिवसात कपाशीचा ओघ वाढला आहे.
गत तीन वर्षांची कापूस खरेदीची आकडेवारी बघितल्यास २०१६-१७ मध्ये पणन महासंघाला भोपळाही फोडता आला नाही. म्हणजेच एक क्विंटलही कापूस खरेदी केला नव्हता. २०१७-१८ मध्ये केवळ २,८५५ क्विंटल तर २०१८-१९ मध्ये ३५,७६३ क्विंटल कापूस पणल महासंघाने खरेदी केला होता. त्या तुलनेत या तीन वर्षात भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने २०१६-१७ मध्ये २ लाख ३१ हजार क्विंटल, २०१७-१८ मध्ये ६८,३८३ तर २०१८-१९ ला ९ लाख ५३ हजार क्विंटल विक्रमी कापूस खरेदी केली. यावर्षी सीसीआयने ८१ खरेदी केंद्र सुरू केली असून, आतापर्यंत २ लाख ५५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला. या तुलनेत पनण महासंघाचे ३४ केंद्रावर १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे.
राज्यात ५० पैकी ३४ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, आजमितीस १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आला आहे. ‘पणन’ला कापूस विक्री करणाºया शेतकºयांना ५५ कोटीच्यावर चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारपर्यंत ७ कोटी ४० लाख रुपयांचे चुकारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. गुरुवारपर्यंत ही रक्कम १५ कोटीपर्यंत गेली असून, उर्वरित चुकारे करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
- राजाभाऊ देशमुख,
अध्यक्ष,
पणन महासंघ.