पीक कापणी प्रयोगातील नोंदी ‘मोबाइल अॅप’द्वारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 10:29 AM2020-09-05T10:29:39+5:302020-09-05T10:29:44+5:30
राज्यातील पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी सर्व माहिती शासनाच्या ‘सीसीई मोबाइल अॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खरीप पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये महसूल, कृषी व पंचायत विभागामार्फत पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले असून, पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी माहिती आता ‘मोबाइल अॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे. खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात. त्यामध्ये पिकांच्या उत्पादनाची माहिती नोंदविण्यात येते. यापूर्वी पीक कापणी प्रयोगात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांकडून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाची माहिती विहित नमुन्यात नोंदविण्यात येत होती; परंतु आता राज्यातील पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी सर्व माहिती शासनाच्या ‘सीसीई मोबाइल अॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे. मूग काढणीला आल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये पीक कापणी प्रयोगात संबंधित तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांकडून पिकांची माहिती ‘मोबाइल अॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे.
मोबाइल अॅपद्वारे अशी नोंदविली जाते माहिती!
पीक कापणी प्रयोगासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकºयाचे नाव, पिकाचे नाव, तालुका, सर्कल, सर्व्हे नंबर, पिकाचे पेरणी क्षेत्र, शेतकºयाचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि पिकाच्या प्लॉटमधील पिकाचे वजन, धान्याचे वजन इत्यादी प्रकारची माहिती मोबाइल अॅपद्वारे नोंदविण्यात येत आहे.