अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ‘रेकाॅर्ड’ची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:38 AM2021-04-12T10:38:05+5:302021-04-12T10:38:23+5:30
Grampanchayat News : ५३६ ग्रामपंचायतींच्या ‘रेकाॅर्ड’ची तपासणी सातही पंचायत समित्यांच्या पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील सर्व ५३६ ग्रामपंचायतींच्या अभिलेखांची (रेकाॅर्ड)ची तपासणी १९ एप्रिलपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) ७ एप्रिल रोजी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ‘रेकाॅर्ड’ची तपासणी सुरू करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणारी विविध विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, योजना व विकासकामांच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायतींना उपलब्ध होणारा निधी, उपलब्ध निधीतून झालेला खर्च, अखर्चित निधी, ग्रामपंचायतींचे कामकाज, तक्रारींचे निवारण आदी प्रकारच्या जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायतींची अभिलेखे (रेकाॅर्ड) अद्ययावत करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या संबंधित ‘रेकाॅर्ड’ची तपासणी १९ एप्रिलपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना ७ एप्रिल रोजी पत्राद्वारे दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ५३६ ग्रामपंचायतींच्या ‘रेकाॅर्ड’ची तपासणी सातही पंचायत समित्यांच्या पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
तपासणीसाठी ‘रेकाॅर्ड’ उपलब्ध करून द्या!
ग्रामपंचायतींचे अभिलेखे अद्ययावत करण्यासाठी अभिलेखांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींमध्ये हजर राहून विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींचे ‘रेकाॅर्ड’ उपलब्ध करून द्यावे. यासंदर्भात संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
तालुकानिहाय ग्रा. पं. रेकाॅर्डची तपासणी एकाच दिवशी!
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रेकाॅर्डची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या रेकाॅर्डची तपासणी करण्यात येणार आहे.