अकोला परिमंडळातील वीज थकबाकी वसूल करा : कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:42 PM2018-02-22T18:42:35+5:302018-02-22T18:45:08+5:30
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील सर्वच वर्गवारीच्या ग्राहकाकडे असलेली वीज थकबाकी योग्य नियोजन करुन वसूल करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(देयक व महसूल) श्री. श्रीकांत जलतारे यांनी दिले.
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील सर्वच वर्गवारीच्या ग्राहकाकडे असलेली वीज थकबाकी योग्य नियोजन करुन वसूल करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(देयक व महसूल) श्री. श्रीकांत जलतारे यांनी दिले. अकोला येथे विद्युत भवनात गुरूवारी आयोजित अकोला ,बुलढाणा व वाशिम या मंडळाच्या आढावा बैठकित ते बोलत होते. परिमंडळातील सर्वच वर्गवारीतील ग्राहकांची असणारी चालू वर्षातील व मागील थकबाकी सर्वत्र वसूल झाली पाहिजे, देयके न भरणार्यांना थकबाकीदारांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम उघडण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर, नागपूर प्रादेशिक विभागाचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदर, अधीक्षक अभियंते दिलीप दोडके, गुलाबराव कडाळे व विनोद बेथारीया यांचेसह कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. कंपनीची स्थिती आर्थिकदृष्ट्या हलाखीची असून आर्थिक गरजा भागवितांना कसरत करावी लागत असून, थकीत बिलाची वसुली जोमाने करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत विजेची गळती व हानी कमी करून वापरलेल्या विजेची देयके ग्राहकांना वेळेत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश श्रीकांत जलतारे यांनी दिले. यावेळी त्यांनी विभागनिहाय आढावा घेऊन आणखी व गतीने सामुहिकपणे कामे करून आणखी दर्जेदार ग्राहकसेवा देण्याचे आवाहन शेवटी सर्वांना केले.
डॅशबोर्डच्या आधारे बैठक
माहिती तंत्रज्ञानाद्वारे महावितरणने कर्मचार्यांसाठी विविध माहिती डॅशबोर्डद्वारे ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे, यामुळे सर्व माहिती अचूक व एकसमान असल्यामुळे त्रुटी दूर होवून परिणामकारक कामे करणे शक्य होत आहे. त्यामुळे याडॅशबोर्ड च्या आधारावरच आजची ही बैठक कार्यकारी संचालक(देयक व महसूल) श श्रीकांत जलतारे यांनी घेतली. व यापुढे सर्वांनी याचप्रमाणे याचा वापर करून, दैनदिन माहिती यामध्ये अद्यावत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.