अकोला परिमंडळात महावितरणची वसुली मोहीम जोरात
By atul.jaiswal | Published: November 11, 2017 03:51 PM2017-11-11T15:51:45+5:302017-11-11T15:59:54+5:30
महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन्ही जिल्ह्यांमध्ये कृषीपंपधारक ग्राहक वगळता सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुलीची मोहिम जोरात सुरु करण्यात आली आहे.
अकोला : महावितरणची आर्थिक स्थिती बिकट असल्याने वीज ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्यावर महावितरणकडून भर दिल्या जात आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन्ही जिल्ह्यांमध्ये कृषीपंपधारक ग्राहक वगळता सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुलीची मोहिम जोरात सुरु करण्यात आली आहे. यासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले असून, पहिल्यांदाच ‘बॅक आॅफीस’ कर्मचाºयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. थकीत देयक न भरणाºया वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
महावितरणचा वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्वच प्रकारातील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी थकबाकी वसुलीवर भर देण्याचे आदेश परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. यानुषंगाने अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिमंडळातील प्रत्येक उपविभागास वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. थकबाकीचा भरणा न करणाºया ग्राहकांविरुद्ध वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकीत देयक भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)