दुष्काळातही शेतसारा वसुली!
By admin | Published: December 6, 2015 02:28 AM2015-12-06T02:28:38+5:302015-12-06T02:28:38+5:30
अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना सवलती केव्हा मिळणार?
अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४२ पैसे जिल्हा प्रशासनमार्फत जाहीर करण्यात आली. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनामार्फत दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी सवलती अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यात शेतकर्यांकडून शेतसार्याची वसुली करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्यांना दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणार्या सवलती केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, कपाशीचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्यावर पोहोचले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या लागवडी योग्य ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी ७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ९९७ गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी आहे. खरीप पिकांच्या पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले; मात्र शासनामार्फत अद्यापही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला नसून, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना द्यावयाच्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यातील शेतकर्यांकडून शेतसारा वसूल करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनामार्फत दिल्या जाणार्या जमीन महसुलात सूट व इतर सवलतींचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्यांना केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.