विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसुली!
By admin | Published: April 14, 2016 02:07 AM2016-04-14T02:07:25+5:302016-04-14T02:07:25+5:30
सात हजार रुपये वसूल केल्याचा आरोप, प्रकरण डाबकी रोड पोलिसांत.
अकोला : जुने शहर परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काची अतिरिक्त वसुली सुरू केल्याचा आरोप करीत या विद्यार्थ्यांनी बुधवारी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. बुधवारी या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती डाबकी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा करण्यात आली होती. शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यातून काढण्यासाठी विद्यार्थी बुधवारी बँकेत गेले. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर शाहबाबू उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी बँकेत येऊन विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी सात हजार रुपये अतिरिक्त शिक्षण शुल्काच्या नावाखाली वसुली सुरू केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काही विद्यार्थ्यांंनी त्यांनी बँकेतून रक्कम काढल्याच्या स्लिपही पोलिसांकडे सादर केल्या. डाबकी रोड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.