२८ कोटींचा थकीत कर वसूल करा - अकोला मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:09 PM2017-12-27T23:09:10+5:302017-12-27T23:23:07+5:30
‘पुढे पाठ अन् मागे सपाट’, या उक्तीनुसार वसुली लिपिकांनी थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्नच केले नसल्याचे समोर आले. या प्रकाराची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेत २८ कोटींचा थकीत कर वसूल करण्यासाठी वसुली लिपिकांना कामाला लागण्याचा आदेश बुधवारी जारी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या वसुली लिपिकांनी मालमत्ताधारकांजवळून एक-दोन नव्हे, तर चक्क २८ कोटींचा मालमत्ता कर वसूल न करताच तो दडवून ठेवला. यामध्ये प्रामुख्याने स्लम भागातील मालमत्ताधारकांचा समावेश आहे. ‘पुढे पाठ अन् मागे सपाट’, या उक्तीनुसार वसुली लिपिकांनी थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्नच केले नसल्याचे समोर आले. या प्रकाराची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेत २८ कोटींचा थकीत कर वसूल करण्यासाठी वसुली लिपिकांना कामाला लागण्याचा आदेश बुधवारी जारी केला.
मागील १६ वर्षांपासून शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन रखडल्यामुळे एकूण मालमत्ता किती, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचा परिणाम मनपाच्या उत्पन्नावर झाला. मालमत्ता कर वसुली विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्तांची नोंद होती. त्यापासून प्रशासनाला वार्षिक अवघे १७ ते १८ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत असे. यातही दरवर्षी सहा ते सात कोटींची थकबाकी दाखवल्या जात होती. अर्थात थकबाकीचा आकडा आठ कोटींच्या पलीकडे क धीही गेला नाही. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन केले. ‘स्थापत्य कन्सलटन्ट’ने हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन भागासह शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले असता, १ लाख ५३ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. यादरम्यान, एजन्सीने मालमत्ताधारक आणि वसुली लिपिकांच्या दस्तावेजांची छाननी केली असता, वसुली लिपिकांनी २00२ पासून शहराच्या स्लम भागातील नागरिकांजवळून मालमत्ता कराची वसुली न करता दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ही थकीत रक्कम तब्बल २८ कोटींपेक्षा जास्त आहे. जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच मनपा कर्मचार्यांनी थकीत वेतन अदा करण्याची मागणी लावून धरली. थकीत वेतनाची समस्या लक्षात घेता आयुक्त वाघ यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता, २८ कोटींच्या थकबाकीचा मुद्दा समोर आला. येत्या फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत २८ कोटींचा थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे निर्देश त्यांनी वसुली लिपिकांना दिले आहेत.
चार महिन्यांच्या वेतनाची सोय!
मनपा कर्मचार्यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. यामध्ये शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे. मालमत्ता कर वसुली विभागाने २८ कोटींची थकीत रक्कम वसूल केल्यास मनपा कर्मचार्यांचे चार महिन्यांचे वेतन अदा होऊ शकते. त्यासाठी संबंधित थकबाकीदारांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले.
..अन्यथा मालमत्तांना सील करा!
पाच हजार, दहा हजार रुपये थकीत असणार्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना सील लावण्यापेक्षा ज्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे, अशा मालमत्ताधारकांना नोटीस द्या, पैसे जमा करत नसतील, तर मालमत्तांना सील लावा; परंतु कोणत्याही परिस्थितीत २८ कोटींची थकीत रक्कम वसूल करण्याचा रोखठोक इशारा आयुक्त वाघ यांनी दिला आहे.
थकबाकीचा आकडा मोठा आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे आमचे कर्तव्य असले, तरी मालमत्ता कर जमा करणे शहरवासीयांची जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच विकास कामे निकाली निघतील.
-जितेंद्र वाघ, मनपा आयुक्त