पाणीपुरवठा योजनांच्या थकीत पाणीपट्टीची वसुली सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:40+5:302021-03-22T04:17:40+5:30
अकोला: जिल्ह्यातील ८४ खेडी व ६४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांची रक्कम अदा ...
अकोला: जिल्ह्यातील ८४ खेडी व ६४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांची रक्कम अदा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांच्या थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची दोन पथके गठीत करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची २ कोटी १९ लाख रुपये वीज देयकांची रक्कम थकीत असल्याने, या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची वीजपुरवठा दोन दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीमार्फत खंडित करण्यात आला होता. त्यामुळे योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. थकीत वीज देयकांच्या रकमेचा भरणा लवकरच करण्यात येणार असून, योजनांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे करण्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वीज वितरण कंपनीच्या अकोला मंडळ अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आल्यानंतर, वीज वितरण कंपनीमार्फत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा १८ मार्च रोजी पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर दोन्ही पाणीपुरवठा योजनांतर्गत १९ मार्चपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतींकडून वसूल करण्याची मोहीम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची दोन पथके गठित करण्यात आली असून, या पथकांमार्फत सध्या ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत अकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ८४ खेडी व ६४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत थकीत वीज देयकांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी थकीत पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतींकडून वसूल करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी थकीत पाणीपट्टीची रक्कम जमा करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.