बिंदू नामावलीत अडकली ‘सीएचबी’ प्राध्यापकांची भरती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:41 PM2019-07-29T14:41:37+5:302019-07-29T14:41:41+5:30

राज्यातील अनेक महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली पूर्ण नसल्याने रिक्त पदांवर ‘सीएचबी’(तासिका तत्त्वावरील) प्राध्यापकांची पदभरती रखडली आहे.

Recruitment of 'CHB' Professors stuck in Roster | बिंदू नामावलीत अडकली ‘सीएचबी’ प्राध्यापकांची भरती!

बिंदू नामावलीत अडकली ‘सीएचबी’ प्राध्यापकांची भरती!

Next

- प्रवीण खेते
अकोला : तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची पदभरती बिंदू नामावलीनुसार करणे अनिवार्य आहे; मात्र राज्यातील अनेक महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली पूर्ण नसल्याने रिक्त पदांवर ‘सीएचबी’(तासिका तत्त्वावरील) प्राध्यापकांची पदभरती रखडली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पूर्वी महाविद्यालयाच्या कार्यभारानुसार तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती केली जात होती; मात्र कालांतराने महाविद्यालयातील रिक्त पदांवरच सीएचबी प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यभरात सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे; मात्र मध्यंतरी मराठा आणि सवर्ण प्रवर्गातील आरक्षणामुळे बिंदू नामावलीमध्ये फेरबदल करण्याचा आदेश महाविद्यालयांना देण्यात आला. नवीन प्रवर्गानुसार काही महाविद्यालयांनी सुधारित बिंदू नामावली तयार केली असली, तरी बहुतांश मोठ्या महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पद मंजूर असले, तरी महाविद्यालयांना रिक्त जागांवर सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करता येत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे पदभरती प्रक्रियेत विविध जाचक अटी लावल्याने उमेदवारदेखील त्रस्त झाले आहेत.

तर प्राध्यापकांची नियुक्ती नियमबाह्य
काही महाविद्यालयांमध्ये कार्यभाराच्या तुलनेत पद मंजूर नाहीत. पद मंजूर नसल्याने अशा महाविद्यालयांना तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची पदभरतीदेखील करता येत नाही. पदभरती केली, तरी ती नियमबाह्य ठरविण्यात येत असून, नियुक्त प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वीदेखील अनेक सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती नियमबाह्य ठरविण्यात आल्याने त्यांना वेतनापासून वंचित राहावे लागले.

या आहेत जाचक अटी...
महाविद्यालयांना विषयाचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
उमेदवाराला एकाच महाविद्यालयात सेवा देता येणार आहे.
त्यासाठी रुजू होतेवेळी संबंधित अध्यापकांकडून उमेदवारांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देणे अनिवार्य आहे.
उमेदवारांची सेवा ही केवळ नऊ महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

काही मोठ्या महाविद्यालयांना वगळता मराठा व सवर्ण आरक्षणानुसार, सुधारित बिंदू नामावलीमध्ये जास्त फरक पडणार नाही. बिंदू नामावलीनुसार पद निश्चिती करून दिल्या जाते. नवीन नियमानुसार एका रिक्त जागेवर दोन सीएचबी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे.
- डॉ. संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, अमरावती.

 

Web Title: Recruitment of 'CHB' Professors stuck in Roster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.