उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती
By आशीष गावंडे | Published: June 17, 2024 08:50 PM2024-06-17T20:50:34+5:302024-06-17T20:50:42+5:30
उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे.
अकाेला: जिल्हा पाेलिस दलाच्यावतीने १९ जून पासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदभरतीसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार, ५ हजार ६९१ महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरु पुरुष उमेवाराची संख्या एक आहे. निमवाडीस्थित पाेलिस मुख्यालयात बुधवारी सकाळी ५ वाजता पासून या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी पाेलिस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती साेमवारी आयाेजित पत्रकार परिषदेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.
उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ८०० पुरुष उमेदवारांना १९ जून व २० जून राेजी तसेच २१ व २२ जून राेजी १हजार उमेदवारांचा समावेश राहील. २४ जून ते १ जुलै या कालावधीत १हजार ५०० उमेदवारांना बोलाविण्यात येइल. २ जुलै राेजी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील १ हजार ६२ पुरुष उमेदवार बोलावल्या जातील. त्यानंतर ३ जुलै राेजी भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी प्रवर्गातील सर्व पुरुष उमेदवारांना बाेलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. यावेळी अपर जिल्हा पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पाेलिस निरीक्षक शंकर शेळके उपस्थित हाेते.
४ जुलै पासून महिला पदासाठी प्रक्रिया
आरक्षण प्रर्वगातील महिला उमेदवारांची चाचणी व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया ४ जुलै पासून सुरु हाेइल. ४ जुलै व ५ जुलै या दाेन दिवसांच्या कालावधीत १ हजार ५०० महिला उमेदवार व ६ जुलै राेजी महिला आरक्षणातील उर्वरित १ हजार ५४ महिला उमेदवार तसेच १०२ महिला भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त अशा एकुण १ हजार १५६ महिला उमेदवारांना पडताळणीसाठी बोलविण्यात आले आहे. उर्वरीत १ हजार ५३५ महिला उमेदवारांची पडताळणी ८ जुलै राेजी पार पडेल. ही पदभरती प्रक्रिया १७ दिवस चालणार आहे. रविवारी या प्रक्रियेला विराम दिला जाणार असल्याचे पाेलिस अधीक्षकांनी सांगितले.
उमेदवारांना चार दिवसांची मुदत
ज्या उमेदवारांना पाेलिस पदभरतीसाठी एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा लागोपाठ मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख देण्यात आली असेल, अशा उमेदवारांना एका ठिकाणची पडताळणी आटाेपल्यानंतर दुस-या जिल्हयात जाण्यासाठी किमान ४ दिवसांच्या अंतराने पदभरतीसाठी मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी raunak.sarafa mahait.org यावर ईमेल करावा, असे पाेलिस अधीक्षक सिंह यांनी नमुद केले.