अकोला तालुक्यात अंगणवाडी मदतनीसच्या ४२ पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू
By रवी दामोदर | Published: July 1, 2023 02:18 PM2023-07-01T14:18:09+5:302023-07-01T14:18:36+5:30
३३ गावांमध्ये भरती प्रक्रिया सुरू : १४ जुलैपर्यंत करता येणार अर्ज
अकोला : एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्त्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहीरनामा बुधवार, दि. २८ जून रोजी जारी करण्यात आला असून, पात्र महिला उमेदवारांनी दि. ३ ते १४ जुलैपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामीण यांनी केले आहे.
भरती प्रक्रिया राबविण्यासाठी गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्यालय तर्फे कळविण्यात आले आहे. या पदासाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण व स्थानिक राहिवासी असणे गरजेचे आहे. भरती संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती ,अर्ज नमुना इ. संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालयात पाहावयास मिळणार आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार असून कुणाच्या भूलथापांना व अमिषाला बळी पडू नये,असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे.
या गावात होणार पदभरती
या पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द ,मारोडी , म्हैसांग , मजलापूर , घुसरवाडी , दोनवाडा , एकलारा , लाखोंडा बु , दहिहांडा , धामणा , सांगवी खु , निराट , निभोंरा , आगर , लोणाग्रा , पाळोदी , टाकळी जलम , उगवा , मंडाळा , कापशीतलाव , लोणी , चांदुर , कुरणखेड ,पातुर नंदापूर ,टाकळी पोटे ,येळवण, देवळी , पैलपाडा , कानशिवणी , बाभुळगाव , बोरगाव मंजु ,वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे.