पाण्याचा स्पर्श झाल्यावरच दिसतात ‘आयत’!
By admin | Published: July 6, 2016 02:40 AM2016-07-06T02:40:55+5:302016-07-06T02:40:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील रोहीणखेड येथील मशिदीची विशेषता.
विवेक चांदूरकर / बुलडाणा
इ.स. १४३७ मध्ये बांधकाम करण्यात आलेली रोहीणखेड येथे एक प्राचीन मशीद आहे. या मशिदीच्या भिंतीवर आतील भागातून कुराणातील ह्यआयतीह्ण लिहिल्या आहेत. या आयती अदृष्य असून, पाण्याचा स्पर्श झाल्यावरच त्या दृष्टीस पडतात. शेकडो वर्षांंपूर्वी काही विशिष्ट द्रव्यापासून लिहिलेल्या या आयती एकप्रकारचा चमत्कारच आहे.
अजिंठा पर्वत रांगांच्या पश्चिमेस नळगंगा आणि जलगंगा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर रोहीणखेड हे प्राचीन गाव वसले आहे. निजामशाहीत रोहीणाबाद हे राजधानीचे शहर होते. इ.स. १४३७ मध्ये येथे खुदावंत खा महमदवीने एक मशीद बांधली. या मशिदीमध्ये आतील भागाच्या भिंतीवर चहूबाजूने अरेबिक भाषेतील काही आयती लिहिल्या आहेत.
या आयती अदृष्य आहेत. मशिदीमध्ये प्रवेश केल्यावर या भिंतीवर काही लिहिले असावे, असे निदर्शनास येत नाही. मात्र, यावरून पाण्याने भिजलेला ओला कपडा फिरविल्यास सदर आयती लाल अक्षरामध्ये दृष्टीस पडतात. हे एकप्रकारे आश्चर्यच असून, अशाप्रकारे आयती असणारी ही एकमेव मशीद असण्याची शक्यता आहे. शेकडो वर्षांंपूर्वी या आयती लिहिण्यात आल्या आहेत. मात्र या कोणत्या द्रव्यातून लिहिण्यात आल्या आहेत, याचा उलगडा अजूनही होऊ शकला नाही.
ही मशीद सध्या पुरातत्त्व खात्याच्या अख्यत्यारित आहे. त्यामुळे मशीद बंद असते तर केवळ शुक्रवारीच नमाज पडण्यासाठी मशीद खुली करण्यात येते. येथे पुरातत्त्व खात्याचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
मशिदीचे बांधकाम संपूर्ण दगडात करण्यात आले आहे. मशिदीमध्ये एक कारंजाही आहे. तसेच मागच्या बाजूला दोन खोल्या आहेत. यामधील एका खोलीतून भुयार असल्याचे सांगण्यात येते. मध्ययुगीन कालखंडात बांधण्यात आलेली ही मशीद निजामकालीन बांधकाम शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अशाप्रकारे बांधकाम अन्य ठिकाणी सहसा बघायला मिळत नाही. इतिहास संशोधकांसाठी ही एक पर्वणी असून, याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.