कृषी कार्यालयांमधील अंतर कमी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:28+5:302021-06-26T04:14:28+5:30
खरीप व रब्बी हंगामातील पिके तसेच फळवर्गीय पिकांसाठी कृषी कार्यालयामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसह प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत याेजनांचा ...
खरीप व रब्बी हंगामातील पिके तसेच फळवर्गीय पिकांसाठी कृषी कार्यालयामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसह प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत याेजनांचा लाभ पाेहाेचविण्याच्या अनुषंगाने व कामात एकसूत्रीपणा यावा या उद्देशातून जिल्ह्याची भाैगाेलिक रचना, शेतकऱ्यांची संख्या, शेतीचे क्षेत्रफळ आदी बाबी लक्षात घेऊन उपविभागीय कार्यालयांचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये दाेन तालुक्यांसाठी किमान एक उपविभागीय कार्यालय कार्यान्वित असले तरी प्रशासकीय अनास्थेमुळे काही ठिकाणी चार-चार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी थातूरमातूर याेजना निकाली काढल्या जात असल्याची बाब समाेर आली आहे. डाेंगराळ, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना ८० किलाेमीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या कृषी कार्यालयात जाणे साेयीस्कर ठरत नसल्यामुळे नाइलाजाने शासनाच्या याेजनांचा लाभ घेता येत नसल्याची तक्रार अकाेला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे केली. यासंदर्भात कृषिमंत्री भुसे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली असता राज्यात अनेक ठिकाणी कृषी कार्यालयांमधील अंतर जास्त असल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत असल्याची बाब निदर्शनास आली़
कृषिमंत्र्यांनी मागितला गाेषवारा!
जिल्हावार कृषी कार्यालयांची संख्या व त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावातील अंतर किती, याचा गाेषवारा सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.