मृत्यूदर कमी करा; रिक्त पदांचा प्रश्न लावून धरू! - देवेंद्र फडणविस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:38 PM2020-06-29T18:38:45+5:302020-06-29T18:39:42+5:30
अकोला: कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करताना दिल्या.
अकोला: कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करताना दिल्यात. शिवाय, यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या समस्या जाणून घेत रिक्त पदांचा प्रश्न आता विधिमंडळात धरून लावू,असे आश्वासनही दिले.
राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणविस हे सोमवारी अकोला दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात पोहोचताच ते आपला ताफा घेऊन कोविड वार्डाकडे निघाले. रुग्णालय परिसराची पाहणी करून त्यांनी वार्ड क्रमांक २४ गाठला. या ठिकाणी वार्डाची स्थिती पाहून त्यांनी स्वच्छता राखण्याचेही निर्देश दिले. सोबतच रुग्णालय प्रशासनाला येणाºया अडचणीही जाणून घेतल्या. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी येणाºया अडचणी जाणून घेतल्या. यावेळी प्रामुख्याने रिक्त पदांवर चर्चा झाली असून, हा प्रश्न विधिमंडळात लावून धरणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. शिवाय, रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्र.अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकाºयांची उपस्थिती होती.
थेट कोविड वार्डाला दिली भेट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचताच देवेंद्र फडणविस यांनी थेट रुग्णालय परिसरात पाहणीला सुरुवात केली. कोविड वार्डाची काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी थेट २४ क्रमांकाच्या कोविड वार्डाला भेट दिली; मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वार्डाच्या बाहेरूनच त्यांनी पाहणी करून दिल्या जाणाºया सुविधांविषयी माहिती जाणून घेतली.