‘शेतकरी आत्महत्या’ शब्दाचा वापर कमी करा!
By admin | Published: July 4, 2017 02:38 AM2017-07-04T02:38:51+5:302017-07-04T02:38:51+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : जबाबदार समाज निर्मितीची उपाययोजना
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकरी आत्महत्या या शब्दाचा वापर कमी करा, अशा सूचना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. नकारात्मक परिणाम होऊ नये आणि जबाबदार समाज निर्मितीसाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी ‘लोकमत’ सोबत बोलताना सांगितले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत ‘मिशन दिलासा’अभियान राबविण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र ‘शेतकरी आत्महत्या’ या शब्दाच्या वापरामुळे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ नये, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढावे, यासाठी शेतकरी आत्महत्या या शब्दाचा वापर कमी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये यासंदर्भात सूचना देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक भावनेचा परिणाम होऊ नये, जबाबदार समाजनिर्मिची भावना वाढावी, यासाठीच ‘शेतकरी आत्महत्या’ या शब्दाचा वापर कमी करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.