'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 07:00 PM2020-06-02T19:00:17+5:302020-06-02T19:00:35+5:30
पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
अकोला. अकोल्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. सर्वपक्षीय नेत्यांनीही त्याकरिता पाठिंबा दिला होता मात्र पहिल्याच दिवशी अकोलेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला नाही. जनतेमध्ये निरूत्साह दिसला अशी खंत व्यक्त करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पालकमंत्री ना. कडू यांनी प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे की, अकोल्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अधिकारी आदीसोबत पाच बैठका घेऊन नियोजन केले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली त्यामुळे शहरात कोरोनाला हरविण्यासाठी जनता कर्फ्यूचा एक महत्वाचा मार्ग होता. सर्वपक्षिय बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला पाठींबा दिला होता त्यामुळेच १ ते ६ जून पर्यंत आपण जनतेला जनता कर्फ्यू बाबत आवाहन केले होते मात्र जनतेमध्ये निरूत्साह दिसून आला, फारसा प्रतिसाद मिळाला नाही याबाबत ना.कडू यांनी दू:ख व्यक्त केले आहे. सध्या शहरात काही प्रमाणात दूकाने उघडी आहेत यामुळे कोरोनाची साखळी तुटणार नाही केवळ प्रशासकीय प्रयत्नांमधून कोरोनाला हरविता येणार नाही, लोकांची साथ आवश्यकच आहे असे कडू यांनी स्पष्ट करून जनता कर्फ्यूची मर्यादा तीन दिवसांनी कमी करत असल्याचे स्पष्ट केले.