अर्धा टक्का व्याजदर कमी करून शिक्षकांना दिला ‘लॉलिपॉप’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:42 PM2019-01-02T12:42:11+5:302019-01-02T12:42:22+5:30
अकोला: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने नववर्षामध्ये कर्जावरील व्याजदर १२.५0 टक्क्यांवरून १२ टक्के केला.
अकोला: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने नववर्षामध्ये कर्जावरील व्याजदर १२.५0 टक्क्यांवरून १२ टक्के केला. केवळ अर्धा टक्का व्याजदर कमी करून जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसून शिक्षकांना ‘लॉलिपॉप’ दिला असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. केवळ अर्धा टक्का व्याजदर कमी केल्यामुळे शिक्षकांना कोणताही लाभ होणार नसल्याचे शिक्षक संघटनेसह खातेदार शिक्षकांनी म्हटले आहे. पतसंस्थेला व्याजदर कमीच करायचा होता, तर मग १ टक्का व्याजदर कमी करायला हवा होता, असा टोमणाही शिक्षक संघटनांनी लगावला आहे.
शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांच्या हितासाठी शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. शिक्षकांचे हित साधण्याची, त्यांच्यासाठी योजना राबविण्याची जबाबदारी पतसंस्थेची आहे. शिक्षकांच्या पैशाच्या बळावर मोठ्या झालेल्या पतसंस्थेने शिक्षकांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय राबविण्याची गरज आहे; परंतु शिक्षकांचे हित साधण्याऐवजी पतसंस्थेत हेव्यादाव्यांचे राजकारण शिजत आहे. पतसंस्थेचे संचालकच पतसंस्थेच्या कारभारावर बोट ठेवतात. शिक्षक पतसंस्थेने घेतलेल्या सत्कार समारंभावर शिक्षकांनी तर बहिष्कार टाकलाच, शिक्षकांनीसुद्धा बहिष्कार टाकला. दिनदर्शिकेतील चुकांनी तर कळस गाठला. त्यामुळे पतसंस्था सर्वच शिक्षक संघटनांच्या रोषाला बळी पडली. आता पुन्हा पतसंस्थेचा आणखी एक निर्णय वादात सापडला आहे. पतसंस्थेने नववर्षानिमित्त शिक्षक सभासदांना कर्जावरील व्याजदर अर्ध्या टक्क्याने कमी केला आहे. या अर्धा टक्का व्याजदर कमी केल्याने शिक्षकांना काहीही फायदा होणार नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षक सहकारी पतसंस्था गतवर्षी स्वयंपूर्ण झाली आहे. त्यामुळे पतसंस्थेने अर्धा टक्का नव्हे, तर ४ टक्के व्याजदरही कमी केला असता, तरी पतसंस्थेला कोणतेही नुकसान झाले नसते, उलट शिक्षकांना त्याचा लाभ मिळाला असता, असेही शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
आॅगस्ट २0१७ मध्ये शिक्षक सहकारी पतसंस्था स्वयंपूर्ण झाली. त्यामुळे सहकारी बँकेकडून संस्थेला कर्ज घेण्याची गरज नाही. पतसंस्थेने ४ टक्के व्याजदर कमी केला असता, तरी कोणताही आर्थिक बोजा पडला नसता. सहकार कायद्यानुसार ९७ वी घटना दुरुस्ती करून व्याजदर कमी करता येऊ शकला असता. अर्धा टक्का व्याजदर कमी करून शिक्षकांना ‘लॉलिपॉप’ देण्याचा हा प्रकार आहे.
-शशिकांत गायकवाड,
जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब शिक्षक संघटना.
यापूर्वी १३ टक्के व्याजदर होता. आता १२ टक्क्यांवर आणला आहे. संस्थेच्या नियमावलीनुसार आम्ही व्याजदर कमी केला. अधिक व्याजदर कमी करण्यासाठी उपविधी दुरुस्ती करावी लागते. गतवर्षीच पतसंस्थेने १७-१८ कोटी रुपयांचे कर्ज फेडले. त्यामुळे कमी व्याजदर योग्य आहे.
-विजय टोहरे, अध्यक्ष,
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था.
शिक्षक पतसंस्थेने अर्धा टक्का व्याज दर कमी करून शिक्षकांची थट्टा केली. पतसंस्था स्वयंपूर्ण झाल्यामुळे १२ टक्के व्याजदर जास्त आहे. आवश्यकता नसताना पतसंस्थेने नोकरभरती करून अनावश्यक खर्च वाढविला. कायम ठेवींवर ८ टक्के व्याजदर असताना, कर्जावर १२ टक्के व्याजदर घेणे शिक्षकांवर अन्याय आहे.
-प्रकाश चतरकार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.