अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजनांचे नोंदणी अभियान १९ डिसेंबरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 04:01 PM2018-11-26T16:01:44+5:302018-11-26T16:02:52+5:30
अकोला: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व सामाजिक सुरक्षा मंडळाच्या वतीने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजना राबविल्या जात आहेत.
अकोला: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व सामाजिक सुरक्षा मंडळाच्या वतीने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचे नोंदणी अभियान १९ नोव्हेंबरपासून १९ डिसेंबरपर्यंत राबविले जात आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, अकोला, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात अभियानाची नोंदणी जोरात सुरू झाली आहे.
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी नोंदणी करावयाची आहे. गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकाची प्रत, पासपोर्ट आकाराची ३ छायाचित्रे आवश्यक आहे. नोंदणीकृत कामगारांना शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनेचा लाभ मिळणार आहे. १९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नोंदणीचा लाभ कामगार आणि त्यांच्या संघटनांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
*कोण बसतो बांधकामाच्या व्याख्येत?
इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, ट्राँसवेज, एअर फिल्ड, पाटबंधारे, जलनिस्सारण, बंधारे, नव्हीगेशन, पूर, टॉवर, कुलिंग टॉवर, धरणे, कालवे, जलाशय, जल, तेल, वायूच्या वाहिन्या, बोगदे, पूल, सेतू आणि पाइपलाइनच्या दुरुस्ती, देखभालीचे काम करणारे सर्व या व्याखेत बसतात. याशिवाय दगड फोडणे, लादी-फरशी काम, रंगकाम-सुतार, नाले बांधणी, इलेक्ट्रिशियन, अग्निशमन यंत्राचे काम, वातानूकुलित यंत्राचे काम, लिफ्ट, विटांचे -कौलांचे काम, सौरऊर्जेशी निगडित काम, स्वयंपाकघरातील काम, उद्याने आदी कामांचादेखील समावेश आहे.
अकोल्यातील नोंदणी अभियानासाठी इतर विभागांची मदत
अकोल्यात सुरू झालेल्या नोंदणी अभियानासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने वाशिम, अमरावती आणि कामगार कल्याण केंद्रातील कर्मचारी, अधिकारी यांना एका महिन्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.