नोंदणी ४२, कामावर ४00 कामगार !

By admin | Published: January 5, 2017 02:40 AM2017-01-05T02:40:18+5:302017-01-05T02:40:18+5:30

माथाडी कामगारांचे शोषण; शासनाच्या डोळ्य़ात धूळफेक; लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून झाले उघड.

Registration 42, workforce 400 workers! | नोंदणी ४२, कामावर ४00 कामगार !

नोंदणी ४२, कामावर ४00 कामगार !

Next

अकोला, दि. ४- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा गोदाम, शिवणी स्थानकातील रेल्वेधक्का या ठिकाणी धान्याची प्रत्यक्ष उचल करणारे आणि त्यापैकी माथाडी मंडळाकडे नोंद असलेल्यांची संख्या पाहता कामगारांचे होत असलेले शोषण आणि शासनाच्या डोळ्य़ात केली जाणारी धूळफेक याचा उत्तम नमूना पहावयास मिळतो. विशेष म्हणजे, माथाडी समस्या निकाली काढणार्‍या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या अपरोक्ष सुरू असलेला हा प्रकार म्हणजे, कायदा आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित करणारा आहे. ह्यलोकमतह्णने बुधवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे वखार महामंडळ, अकोला विभागीय माथाडी मंडळाच्या कामगार कल्याणाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त झाला आहे.
कोणत्याही ठिकाणी श्रमजीवी काम करणार्‍यांच्या हिताचे, आरोग्याचे रक्षण करणारा कायदा अकोला जिल्ह्यात कागदावरच उरला आहे. त्याचा प्रत्यय वखार महामंडळाच्या गोदामात धान्य उचल देणे, गोदामात साठा करणार्‍या मजुरांची संख्या आणि प्रत्यक्षात कामावर असणारे, यामध्ये मोठी तफावत आहे. धक्क्यावर आलेल्या रॅकमधून २५00 टन धान्य एकाच दिवशी खाली करण्यासाठी कामगारांच्या मजुरीची रक्कम २ लाख १८ हजार ४00 रुपये होते. ती रक्कम माथाडी मंडळात नोंदीत कामगारांना देय असल्यास त्यावर ३0 टक्के लेव्हीची रक्कम संबंधितांना कामगारांच्या कल्याणासाठी माथाडी मंडळात जमा करावी लागते. त्या रकमेवर लेव्हीची रक्कम पाहता ती ६५५२0 रुपये एवढी आहे. तर त्याचवेळी वखारच्या गोदामात तेच धान्य साठा करण्यासाठी कामगारांची मजुरी १ लाख ४३ हजार रुपये होते. त्यावर कायद्यानुसार लेव्हीची रक्कम ४२,९00 रुपये माथाडी मंडळात जमा होणे आवश्यक आहे. एका महिन्यात किमान चार रॅकचे काम केले जाते. त्या सर्व कामांसाठी दोन्ही ठिकाणी कामगारांना दिल्या जाणार्‍या मजुरीसोबतच माथाडी मंडळात जमा करावी लागणारी एकूण ४ लाख ३३ हजार ६८0 रुपये रकमेची लेव्ही दरमहा बुडवल्या जात असल्याचा प्रकार घडत आहे. कामगारांचे नुकसान करण्यासोबतच शासनाच्याही डोळ्य़ात धूळफेक करण्याचा प्रकार सुरू आहे.

रेल्वेधक्क्यावर एकाचवेळी १८0 कामगार
बुधवारी शिवणी स्थानकातील रेल्वेधक्क्यात ५८ रॅकमधून धान्याची पोती रिकामी करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जड वाहतूक करणारे किमान २२ वाहने धक्क्यावर होती. रॅकमधून एका वाहनात धान्य टाकण्यासाठी किमान सहा ते आठ माथाडी कामगार होते. तसेच एका पॉइंटवर दहा कामगार ठेवले जातात. मालगाडीच्या ५८ रॅकसाठी १५ पॉइंट ठेवण्यात आले. ती संख्या पाहता धक्क्यावर एकाचवेळी किमान १८0 माथाडी कामगार धान्य उचलत होते.

माथाडी मंडळात प्रत्यक्ष ४२ कामगारांचीच नोंद!
राज्य वखार महामंडळाच्या गोदामात धान्य साठा करणे, त्याची उचल देणे, या नियमित कामासाठी ४२ कामगारांची नोंद केलेली आहे. माथाडी कायद्यानुसार कामगारांचे कल्याण, आरोग्य आणि इतर सुरक्षिततेसाठी मंडळात नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र, असुरक्षित असलेल्या दोन्ही ठिकाणी काम करणार्‍यांची नोंदच माथाडी मंडळात नाही, हा गंभीर मुद्दा आहे.

माथाडीकडे नोंद नसलेल्यांना प्रवेशच नाही!
विशेष म्हणजे, माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ६ सप्टेंबर २0१६ रोजीच्या आदेशात जिल्हाधिकार्‍यांना अध्यक्ष नेमले आहे. त्या आदेशातील मुद्दा २ मधील परिच्छेद ई नुसार माथाडी मंडळाने कामगारांना फोटोसह ओळखपत्र दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही मालकाने कामगारांची ओळखपत्रे तपासल्याशिवाय प्रवेश देऊ नये, असे बंधन आहे. मात्र, रेल्वेधक्का आणि वखारच्या गोदामात तब्बल ४00 कामगारांकडे कोणतेच ओळखपत्र नाही. तरीही त्यांच्याकडून काम करवून घेण्यात येत आहे.

वखारच्या गोदामातही १५0 कामगार

दरम्यान, रेल्वेधक्क्यावर धान्य वाहनात टाकणारे आणि ते धान्य उतरून गोदामात साठा करण्यासाठी तेवढय़ाच संख्येने म्हणजे, १५0 पेक्षाही अधिक माथाडी कामगार राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होते. या दोन ठिकाणची संख्या पाहता ती चारशेच्या जवळपास आहे. त्या कामगारांची कुठेच नोंद नाही, हे विशेष.


माथाडी कायद्याच्या १५ शेड्युलमध्ये रेल्वे प्राधिकरणाचाही आधीच समावेश आहे. त्यामुळे माथाडी मंडळाने रेल्वे आस्थापना नोंदीत केल्यास आपोआप कंत्राटदार नोंदीत होईल. मध्य रेल्वेचे अकोला वगळता सर्वच धक्क्यावर तशी नोंद झालेली आहे. चार दिवस रॅक आली तरी कामगारांची महिनाभराची सोय होईल, तेवढी मजुरी मिळते. मात्र, लेव्हीची रक्कम लाटण्यासाठी कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते. माथाडी मंडळात लेव्ही न देणे, मजुरी रोखीने देणे नियमबाह्य आहे.
- डॉ. हरीश धुरट,
राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळ, नागपूर.


रेल्वेधक्का आणि वखार महामंडळाच्या गोदामात नोंदीत नसलेल्या कामगारांकडून काम सुरू असल्याबाबत माहिती घेतली जाईल. माथाडी मंडळाच्या निरीक्षकांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला जाईल. शासन निर्णय, कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील.
- व्ही.आर. पाणबुडे,
अध्यक्ष, विभागीय माथाडी मंडळ, अकोला

रॅकच्या दिवशी अतिरिक्त कामगार लागतातच. त्यासाठी बाहेरच्या कामगारांकडून काम करून घेतले जाते. वखार महामंडळाने माथाडी मंडळात ४२ कामगारांची नोंद केली आहे. चारवेळा रॅक असली की अनोंदीत कामगारांना प्रवेश दिला जातो.
- आर.जी. बुंदेले,
भंडार व्यवस्थापक, राज्य वखार महामंडळ.

Web Title: Registration 42, workforce 400 workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.