अकोला जिल्ह्यात ५५ हजार नवीन मतदारांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:35 PM2018-10-31T16:35:06+5:302018-10-31T16:35:18+5:30
अकोला: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ५४ हजार ८२८ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
अकोला: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ५४ हजार ८२८ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याने, जिल्ह्यातील नवीन मतदारांच्या नोंदणीत वाढ होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात बदल, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमुना अर्ज भरून घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात येत आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदारांकडून नमुना क्र.६ चा अर्ज भरून घेण्यात येत आहे. मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते २९ आॅक्टोबर या कालावधीत ५४ हजार ८२८ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संबंधित मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले.
मतदारसंघनिहाय अशी आहे
नवीन मतदारांची नोंदणी!
मतदारसंघ मतदार
अकोला पश्चिम १४,५००
अकोला पूर्व ७,०९५
अकोट ९,५००
बाळापूर १२,८००
मूर्तिजापूर १०,९३३
.............................................
एकूण ५४,८२८
मतदार नोंदणीचा आज
शेवटचा दिवस!
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीचा बुधवार, ३१ आॅक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी संबंधित तहसील कार्यालय व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) संपर्क साधून, जिल्ह्यातील पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली देवकर यांनी केले आहे.