बीएस-४ मानकांच्या वाहनांची नोंदणी रद्द होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 02:17 PM2020-03-13T14:17:42+5:302020-03-13T14:17:51+5:30
मुदतीत नोंदणी न केल्यास त्यानंतर कायमस्वरूपी त्या वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरातील प्रदूषणाला रोखण्यासाठी बीएस-४ मानके असलेल्या वाहनांची नोंदणी ३१ मार्चनंतर रद्द होत आहे. त्यानंतर कोणत्याही वाहनाची नोंदणी होणार नाही. आधी खरेदी केलेल्या मात्र संगणकीय प्रणालीवर नोंदणी प्रलंबित असलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या वाहनधारकांना २० मार्चपर्यंत संधी देण्यात येत असून, संबंधितांनी ती करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.
देशभरातील प्रदूषणाला वाहनांमधील इंधनाचे ज्वलन हा घटकही कारणीभूत आहे. त्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल, या पद्धतीने इंधन ज्वलन करण्यासाठी वाहनांमध्ये बदल करण्यात आले. त्यासाठी भारत स्टेज- १ पासून सुरुवात झाली. आता भारत स्टेज चार प्रकारातील वाहनांनाही प्रतिबंध केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीच दिलेल्या निर्देशानुसार या वाहनांची परिवहन विभागाच्या संगणकीय प्रणालीत नोंद घेणेही ३१ मार्च २०२० पासून बंद होणार आहे. त्यामुळे आधीच्या काळात खरेदी केलेल्या वाहनधारकांची प्रचंड अडचण होणार आहे. त्यांना संगणकीय प्रणालीत नोंद करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत नोंदणी न केल्यास त्यानंतर कायमस्वरूपी त्या वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे. अकोला जिल्ह्यात ट्रक, बसेस, दुचाकी, ट्रॅक्टरची संख्या मोठी आहे. त्याचवेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संगणकीय नोंद प्रणालीत ४१३ वाहने प्रलंबित असल्याचे पुढे येत आहे. त्याशिवाय, प्रणालीत नोंद नसलेली हजारो वाहने आहेत. त्या वाहनधारकांनी २० मार्चपर्यंत संगणकीय प्रणालीत नोंद न केल्यास ३१ मार्चनंतर त्या वाहनांची नोंदणी पूर्णत: रद्द होणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार यांनी केले आहे.
तरच गुढीपाडव्याला वाहन मिळेल - वरोकार
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्च रोजी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच वाहन त्यांच्याकडे दिले जाणार आहे. त्यासाठी ६ ते ७ दिवस अगोदर शुल्क, कर भरणा तसेच इतरही बाबींची पूर्तता करावी, त्यानंतर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरकाकडून वाहन सुपूर्द केले जाणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी आवश्यक बाबी आधीच करून घ्याव्या, असे आवाहनही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.