ग्रामीण रुग्णालयात होणार विवाहाची नोंदणी
By Admin | Published: April 6, 2017 01:33 AM2017-04-06T01:33:11+5:302017-04-06T01:33:11+5:30
अकोला : ज्या नागरी भागात ग्रामीण रुग्णालय आहे, त्याठिकाणीच आता विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना नोव्हेंबर २०१६ मध्येच प्रसिद्ध झाली.
अकोला : ज्या नागरी भागात ग्रामीण रुग्णालय आहे, त्याठिकाणीच आता विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना नोव्हेंबर २०१६ मध्येच प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना त्याबाबत आरोग्य विभागाने पत्र पाठवले. मात्र, संबंधित अधीक्षकांकडून विवाह नोेंदणी प्रमाणपत्र देण्याला सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे.
आधी विवाह नोंदणी निबंधक म्हणून महापालिकेत प्रभाग अधिकारी, नगरपालिका, नगर पंचायतींमध्ये मुख्याधिकारी, कटक मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घोषित करण्यात आले होते. या विषयाशी संबंधित जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आधी विवाह निबंधक म्हणून घोषित केलेले प्रभाग अधिकारी, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ते काम २३ मार्च २०१६ पासूनच काढून घेण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने ११ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यामध्ये त्यांच्याऐवजी महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळाच्या क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी यांना ‘निबंधक’ विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही नगर परिषदांकडे वैद्यकीय अधिकारी नाहीत. त्याठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी ज्याठिकाणी ग्रामीण रुग्णालय नाही, तेथे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीच पुढील आदेशापर्यंत विवाह नोंदणीचे काम पहावयाचे आहे. ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ग्रामसेवक हेच नोंदणी निबंधक राहणार आहेत, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर या शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ते काम सुरू करावे, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्वोपचार रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांनी संबंधितांना कळवले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीत त्यांच्याकडून अंमलबजावणीची माहिती घेतली जाईल, असेही सांगितले. १ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्व संबंधितांना कळवल्यानंतरही विवाह नोंदणीचे काम सुरूच झाले नसल्याची माहिती आहे. त्यातच विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज असणारांनाही त्याबाबत फारशी माहिती नसल्याने थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.