सौर कृषिपंपांसाठी अकोला जिल्ह्यातील २,५११ शेतकऱ्यांची नोंदणी
By Atul.jaiswal | Published: June 3, 2023 06:52 PM2023-06-03T18:52:00+5:302023-06-03T18:52:40+5:30
अजूनही १२१७ सौर पंप शिल्लक असल्याची माहिती
अतुल जयस्वाल, अकोला: महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत राज्यातील कृषिपंप वीजजोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेंतर्गत चालू वर्षाकरिता अकोला जिल्ह्यासाठी ३७२८ पंपांचे उद्दिष्ट असून, ऑनलाइन पोर्टलवर दि. १७ मे रोजी अर्ज सुविधा उपलब्ध झाल्यापासून १ जूनपर्यंत २,५११ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविता येईल परिणामी त्यांचे जीवन सुगम आणि सुखकर होण्यास मदत होईल या ध्येयाला समोर ठेवून शासनाने शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना २०२३, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या नवीनतम पीएम कुसुम योजनेचे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आहे. अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरण- २०२० अंतर्गत प्रतिवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील ५ वर्षांत ५ लाख पारेषणविरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यास मान्यता दिली आहे. राज्यात हे अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा) मार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी पारेषणविरहित सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील २,५११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, अजूनही १२१७ सौर पंप शिल्लक असल्याची माहिती आहे.
ऑनलाइन पोर्टलवर करा अर्ज
पीएम-कुसुम योजना राबविण्यासाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलवर विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करावा. सौर कृषिपंपासाठी पुरवठादाराकडून पाच वर्षांसाठीचा सर्वंकष देखभाल व दुरुस्ती करार केला आहे व तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. सौर कृषिपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यांस हस्तांतरित करण्यात येईल.