‘एनएमएमएस’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:28 PM2018-09-14T13:28:37+5:302018-09-14T13:30:14+5:30
अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी १२ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागासह विज्ञान अध्यापक मंडळाने केले आहे.
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील १0 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती; परंतु आता त्यात वाढ करण्यात आली असून, वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अकोला जिल्ह्यातून दरवर्षी या परीक्षेला अडीच ते तीन हजार विद्यार्थी बसतात. ही शिष्यवृत्ती आठवी ते बारावीपर्यंत देण्यात येते; परंतु त्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक वर्गाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करावी लागते. गतवर्षी जिल्ह्यातून एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी ३५0 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यंदा त्यात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘एनएमएमएस’ परीक्षेसाठी नोंदणी करावी, असे शिक्षण विभागासह जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, अनिल मसने, ओरा चक्रे, अनिल जोशी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)