काँग्रेसच्या महानगर अध्यक्षाची धुरा आता तरुणाईच्या खांद्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:20 IST2021-08-29T04:20:23+5:302021-08-29T04:20:23+5:30
आशिष गावंडे/ अकोला काँग्रेस पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते, पदाधिकारी, तसेच काही युवा ...

काँग्रेसच्या महानगर अध्यक्षाची धुरा आता तरुणाईच्या खांद्यावर!
आशिष गावंडे/ अकोला
काँग्रेस पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते, पदाधिकारी, तसेच काही युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे दिसून आले. काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी यांना प्रदेश कार्यकारिणीत प्रमोशन दिल्यानंतर आता महानगर अध्यक्षपदासाठी तरुणाईला संधी दिली जाणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे महानगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी राज्यभरात दौरा काढून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. नाना त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी कोरोना काळात अनेक जिल्हे पिंजून काढत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जोश भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यादरम्यान, त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर कार्यकारिणीमध्ये फेरबदल करणे गरजेचे असल्याचे सूतोवाच केले होते. काँग्रेस हायकमांडने जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, तसेच अनुभवी पदाधिकाऱ्यांना समाविष्ट केले. काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा अशोकराव अमानकर यांच्या खांद्यावर देत माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, तसेच महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिले. त्यामुळे रिक्त झालेल्या महानगराध्यक्ष पदासाठी तरुण चेहऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी प्रामुख्याने राजेश भारती, डॉ. प्रशांत वानखडे, निखिलेश दिवेकर, तसेच इतर काही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.
सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य लक्षात घेता पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा अशोकराव अमानकर यांच्याकडे दिल्याचे दिसून येते. या माध्यमातून पक्षाकडून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशावेळी सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून महानगराध्यक्षपदाची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मनपाच्या निवडणुकीचीही चाचपणी
अवघ्या चार महिन्यांनंतर फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. राज्य निवडणूक आयोगाने वार्ड रचना जाहीर केल्यामुळे मनपा निवडणुकीत पक्षाला कोणता चेहरा फायदेशीर ठरणार या अनुषंगानेही प्रदेश स्तरावरून चाचपणी केली जात आहे.